Dilip Walse-Patil : वळसे पाटलांच्या ७३ वर्षांच्या सत्तेला सुरूंग! सामान्य कार्यकर्त्याने कॅबिनेट मंत्र्याला दाखवले आस्मान

Dilip Walse-Patil : पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रतिष्ठेची आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निरगुडसर गावची ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल नुकताच लागला. यामध्ये त्यांना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत वळसे पाटील कुटुंबाच्या ७३ वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागला आहे.

यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. शिंदे गटाने वळसे पाटील यांना धोबीपछाड देत कुटुंबाची ७३ वर्षांची सत्ता उधळून लावली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्या गावातच धोबीपछाड देण्यात आढळराव पाटील यांना यश आले आहे.

दरम्यान, या गावात दिलीप वळसे पाटील यांच्या वडिलांच्या काळापासून या गावावर सत्ता होती. वळसे पाटील हे अजित पवार यांच्या गटात गेल्याने अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. याचे कारण म्हणजे ते शरद पवार यांच्या सर्वात जवळचे नेते होते.

दरम्यान, आढळराव पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आढळराव पाटील यांनी गावोगावी आपले दौरे सुरू केले होते. सर्वच सार्वजनिक आणि खाजगी कार्यक्रमांना आढळराव पाटील हजेरी लावत होते. त्याचाच फायदा आढळराव पाटील यांना झाला.

तसेच राज्यातील घडलेल्या राजकीय घडामोडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेले दोन गट याचा या निवडणुकीत विरोधकांना फायदा झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे येणाऱ्या काळात अनेक निवडणुकीत देखील वेगळे चित्र बघायला मिळेल, असे म्हटले जात आहे.

बारामतीत अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे आपले वर्चस्व दाखवत ग्रामपंचायतींवर सत्ता काबीज केली आहे. मात्र अजित पवारांच्या वार्डात मात्र उमेदवार पडला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.