Mumbai news : मुंबईत रात्री वांद्रे वरळी सी लिंकवरील टोल प्लाझावर मोठा अपघात झाला. यामुळे एकच खळबळ उडाली. सी लिंकवर काही वाहने टोलनाक्यावरून जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने एकामागून एक अनेक वाहनांना धडक दिली. यामुळे हा अपघात झाला.
या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले आहेत. याठिकाणी वेगात असलेली कार वरळीहून वांद्र्याकडे येत होती. याबाबत माहिती अशी की, वेगात येणाऱ्या कारच्या चालकाने सी लिंकवर दुसऱ्या वाहनाला जोरदार धडक दिली.
या घटनेनंतर पकडले जाऊ नये म्हणून गाडीचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सहा गाड्या एकमेकांवर आदळल्या. यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये नऊ जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात कार चालकालाही दुखापत झाल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. त्याची कार जप्त करण्यात आली आहे. या घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. अपघातानंतर पोलीस लगेच याठिकाणी उपस्थित झाले.
याठिकाणी टोल बुथवर बसलेल्या कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. कारला धडकलेल्या कारचेही नुकसान होऊन ती बंद पडली. त्याच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, या कारचा वेग जास्त असल्याचे सांगितले जात आहे. तसेच पकडले जाण्याची भीती जास्त वाटल्याने हा अपघात झाला आहे. याबाबत सध्या पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.