पावसाळा आता सुरु झाला आहे. त्यामुळे अनेकजण फिरायला निघालेले दिसून येतात. काही लोक हे ट्रेकिंगला जातात तर काही त्यांना हवं तिथे फिरून येतात. पण आशा वातावरणात समुद्राजवळ फिरायला जाणं किती धोकादायक असू शकतं हे सांगणारा एक व्हिडिओ समोर आला आहे.
फिरायला गेल्यावर लोकांना फोटो काढण्याची प्रचंड हौस असते. पण यामुळे अनेकदा लोकांचा जीवही जातो. असाच एक प्रकार मुंबईत घडला आहे. एक कुटुंब समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आलं होतं. त्यावेळी एक महिला समुद्राच्या लाटेत वाहून गेल्याचे समोर आले आहे.
वांद्रे येथील समुद्रकिनारा फिरायला हे कुटुंब आलं होतं. यामध्ये ज्योती सोनार नावाची महिला होती. ती समुद्राजवळ जाऊन एका दगडावर बसली होती. त्यावेळी तिचा पतीही तिच्यासोबत होता. त्यावेळी फोटो काढत असताना एका लाटेमध्ये ती वाहून गेली आहे.
तिचा पती मुकेश म्हणाला की, मी तिला वाचवण्याचा पुर्ण प्रयत्न केला होता. पण जेव्हा ती लाट आली तेव्हा आम्ही दोघेही घसरलो. मी तिची साडी पकडून ठेवली होती. तर एका माणसाने मला पकडून ठेवले होते. पण मला तिला वाचवणं शक्य झालं नाही.
मुकेश म्हणाला की, आम्ही त्या रविवारी जुहूला जाण्याचं ठरवलं होतं. पण भरती ओहोटीमुळे आम्हाला तिथे जाता आले नाही. त्यामुळे आम्ही वांद्रे येथे जाण्याचा प्लॅन केला. त्यावेळी आम्हाला फोटो काढायचे होते. त्यामुळे आम्ही किनाऱ्यावर असलेल्या दगडावर बसलो आणि फोटो काढू लागलो.
पुढे तो म्हणाला की, आम्ही फोटो काढू लागलो तेव्हा मुलंही तिथे येण्याचा हट्ट करत होती. पण आम्ही त्यांना येऊ दिले नाही. कारण लाटा खुप जास्त होत्या. आम्ही जेव्हा फोटो काढायला सुरुवात केली तेव्हाच ही दुर्दवी घटना घडली. ती पाण्यात गेल्यानंतर लगेचच अग्निशमन दलाकडून मोहिम सुरु करण्यात आली होती. रविवारी रात्री उशिरा ज्योतीचा मृतदेह सापडला होता.