India vs newzealand match result : विराट-श्रेयसच्या वादळानंतर शमीचा जलवा, भारताने 1590 दिवसांनी घेतला न्यूझीलंडचा बदला, वर्ल्डकप फायनलमध्ये दाखल

India vs newzealand match result : विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र, प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. भारतीय संघाकडून विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी शानदार शतकी खेळी खेळली. याशिवाय शुभमन गिलनेही महत्त्वाचे योगदान दिले.

उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला. न्यूझीलंडचा पराभव करून भारताने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत सलग दहाव्या विजयाची नोंद केली. भारताने 1590 दिवसांनंतर 2019 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत किवी संघाकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला.

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने चार गडी गमावून 397 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने 29 चेंडूत 47 धावा केल्या. तर शुभमन गिलने 66 चेंडूत 80 धावांची नाबाद खेळी केली.

याशिवाय किंग कोहलीने कारकिर्दीतील 50 वे वनडे शतक झळकावले आणि 113 चेंडूत 117 धावांची उत्कृष्ट खेळी केली. या शतकासह, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 शतके झळकावणारा पहिला फलंदाज ठरला.

त्याच्याशिवाय श्रेयस अय्यरनेही ७० चेंडूत झटपट १०५ धावा केल्या. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलनेही २० चेंडूत ३९ धावांची स्फोटक खेळी खेळली.

केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीत धडक मारणाऱ्या न्यूझीलंडला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. 398 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाचे सलामीचे फलंदाज कमाल दाखवू शकले नाहीत.

डावखुरा फलंदाज डेव्हॉन कॉनवेने 15 चेंडूत 13 धावा केल्या, तर रचिन रवींद्रही 22 चेंडूत 13 धावांची खेळी करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार के विल्यमसन ७३ चेंडूत ६९ धावा करून बाद झाला. तर ग्लेन फिलिप्सने 41 धावांचे योगदान दिले.

या सामन्यात भारतीय संघाचे गोलंदाज संघर्ष करताना दिसले. गोलंदाजांना एकही विकेट मिळत नव्हती. डॅनियल मिशेल आणि केन विल्यमसन हे जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होते, मात्र यादरम्यान रोहितने एक युक्ती लढवली. त्याने 33व्या षटकात मोहम्मद शमीकडे चेंडू सोपवला.

या षटकात मोहम्मद शमीने न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांनाही बाद केले. मारक दिसणाऱ्या केन विल्यमसनला त्याने बाद केले. यानंतर त्याने टॉम लॅथमला 0 धावांवर बाद केले. याशिवाय त्याने डॅनियल मिशेलला 45.2 षटकांत 134 धावांवर बाद केले.

या सामन्यात न्यूझीलंडची वेगवान गोलंदाजी भारतीय फलंदाजांसमोर झुकताना दिसली. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने 10 षटकात 86 धावा देऊन एक विकेट घेतली. टीम साऊदीलाही चांगलाच फटका बसला. त्याने 10 षटकात 100 धावा देत तीन बळी घेतले.