आपल्या देशात खवैय्यांची काही कमी नाही. अनेकांना वेगवेगळ्या गोष्टी खायला आवडत असतात. अनेकजण तर खाताना पैज सुद्धा लावतात. पण पैज लावणे हे कधी कधी महागातही पडू शकते. बिहारमधून अशीच एक भयानक घटना समोर आली आहे.
बिहारमध्ये मोमोज खाताना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तरुणाने मोमोज खाण्याचं चॅलेंज स्वीकारलं होतं. त्यामुळे मित्रांसोबत मोमोज खायला तो गेला होता. यावेळी त्याने तब्बल १५० मोमोज खाल्ले.
हे चॅलेंज जिंकल्यानंतर सर्वजण घरी परतले, तोही त्याच्या दुकानावर पोहचला. पण त्याला अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर अचानक त्याला घाम फुटला आणि तो बेशुद्ध पडला. त्यामुळे त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
विपीन कुमार असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. तो सिहोरवा गावामध्ये राहत होता. विपीनचा मृत्यू विषप्रयोगामुळे झाला असल्याचे त्याच्या वडिलांनी म्हटले आहे. सध्या त्याचे शवविच्छेदन झाले असून पोलिसांनी त्याचा मृतदेह कुटुंबाला सोपवला आहे.
गुरुवारी विपीन त्याच्या मोबाईलच्या दुकानात बसलेला होता. तेव्हा त्याचे काही मित्र तिथे आले. ते सगळे मिळून मोमोज खायला गेले. कोण जास्त मोमोज खातं असे चॅलेंज त्यांनी एकमेकांना दिले. या चॅलेंजमुळे विपीनने जवळपास १५० मोमोज खाल्ले.
विपीनने हे चॅलेंज जिंकले. त्यानंतर त्याचे मित्र त्यांच्या त्यांच्या घरी निघून गेले तर विपीनही त्याच्या दुकानावर येऊन बसला. पण त्याची प्रकृती अचानक खराब झाली आणि तो बेशुद्ध पडला. विपीनला त्याच्या कुटुंबाने रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
विपीनच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. विपीनच्या वडिलांनी असा आरोप केला आहे की, विपीनला विष देण्यात आले होते. आता पोलिस शवविच्छेदनाची वाट पाहत असून त्यातूनच त्याच्या मृत्युचे कारण समोर येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.