Lalit Patil Case : ललित पाटील केस प्रकरणी धक्कादायक माहिती समोर, दोन पोलिसांना अटक, प्रकरणाला वेगळे वळण..

Lalit Patil Case : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात ड्रग्स प्रकरणी ललित पाटील अटकेत आहे. यामुळे याबाबत दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येत आहे. पहिल्यापासूनच याप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत आहे. यामुळे याचा तपास सुरू आहे.

आता ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ससून रुग्णालयातील कैद्यांच्या उपचार कक्षात नियुक्तीस असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य योग्यपद्धतीने बजावले नाही. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

तसेच पाटील याला पळून जाण्यास मदत केल्याचा ठपका ठेवून दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातून चालविण्यात येणारे अमली पदार्थ तस्करी रॅकेट उद्धवस्त केले. या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला ललित पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल केला होता.

आता नाथाराम काळे आणि अमित जाधव या पोलिसांना अटक करण्यात आली आहे. ललित पाटील ससून रुग्णालयातून मेफेड्रोनची विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती.

नंतर पोलिसांच्या पथकाने ललितच्या साथीदाराला आणि ससून रुग्णालयाच्या उपाहारगृहातील कामगाराला अटक केली. त्यांच्याकडून दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. याबाबतच तपास सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली होती.

ललित पाटीलने दोन ऑक्टोबर रोजी बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन रुग्णालयातून पलायन केले होते. मात्र नंतर त्याला अटक केली गेली होती. मात्र सहायक निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक आणि सात पोलिस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते.

आता ललितला पसार होण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून पोलिस नाईक नाथाराम काळे आणि अमित जाधव यांना अटक करण्यात आली. याबाबत आता कसून चौकशी केली जात आहे.