Mumbai News : मुंबईमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी शिवडी येथे वास्तव्यास असलेल्या सुमन चौरसिया यांचा तीन वर्षांचा मुलगा सोमवारी घराबाहेर खेळता-खेळता गायब झाला. यामुळे मोठी खळबळ उडाली. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला.
कल्याणमध्ये विक्री करण्यासाठी तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले. मात्र या प्रकरणी तिघांना वडाळा पोलिसांनी अटक केली. त्यांना दोन लाख रुपये मिळाले नसल्याने हा अपहरणाचा प्रयत्न फसल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.
सानिका वाघमारे, पवन पोखरकर आणि सार्थक गोमणे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. दरम्यान, खेळताना गायब झालेला मुलगा सापडत नसल्याने सुमन यांनी वडाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.
पोलिसांनी या घटनेची दखल घेत अपहरणाचा गुन्हा दाखल केला. एका बाजूला पोलिसांचा तपास सुरू असताना दुसरीकडे आपल्या मुलाला सानिका हिच्यासोबत जाताना काही जणांनी पाहिल्याचे सुमन यांना समजले. यामुळे पोलिसांना लिंक लागली.
सुमन यांनी तत्काळ सानिकाला फोन केला. तिने आपण कॉलेजात असल्याचे पोलिसांना सांगितले. असे असताना सानिका हिनेच चौरसिया यांच्या मुलाचे अपहरण केले होते. टॅक्सीने मुलाला विकण्यासाठी सर्वजण कल्याण येथे गेले. सानिकाने मुलाच्या बदल्यात दोन लाखांची मागणी त्यांच्याकडे केली.
तिला लगेच पैसे देण्यास पवनने नकार दिला. यामुळे सानिका त्या मुलाला घेऊन पुन्हा शिवडीत आली. सानिकाने चौरसियांच्या मुलास ओळखीच्या एका व्यक्तीकडे दिले. आपल्याला तो सापडला असल्याचा बनाव तिने केला. या व्यक्तीने मुलास घेऊन वडाळा पोलीस ठाणे गाठले.
तेव्हा घडलेला सगळा प्रकार समोर आला. पोलिसांनी मुलाकडे चौकशी केली, त्यावेळी त्याने सानिकाचे बिंग फुटले. त्या तीन वर्षांच्या मुलाने आपण सानिका हिच्यासोबत होतो, असे पोलिसांना सांगितले. यामुळे पोलिसांनी तिला अटक केले.