Dhule news : धुळे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील साक्री शहरात असेल्या सरस्वती नगरातील दौलत या बंगल्यावर दरोडा पडला आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.
यामध्ये दरोडेखोरांनी सोन्या चांदीसह एक २३ वर्षाच्या तरुणीलाही पळवले. येथील सरस्वती नगरात दौलत या बंगल्यात जोत्सना पाटील ह्या ब्युटी पार्लर चालवतात. काल त्यांचे पती काही कामानिमित्त संगमनेरला गेले होते. यावेळी संधी साधून दरोडेखोरांनी ही चोरी केली.
जोत्सना पाटील यांनी आपल्यासोबत कोणी तरी असावे म्हणून त्यांच्या २३ वर्षीय भाचीला आपल्या घरी बोलावून घेतले. दरम्यान, रात्री दरवाजा वाजला यामुळे जोत्सना पाटील यांना वाटले पती आले असतील. यामुळे त्यांनी दरवाजा उघडला.
असे असताना मात्र तोंडावर मास्क बांधलेले ५ जण जबरदस्तीने घरात शिरले. त्यांनी जोत्सना पाटील यांना मारहाण केली. त्यांनी घरातील बेडरूममध्ये एक कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने लुटून नेले. घटनेची माहिती मिळताच धुळे पोलीस याठिकाणी दाखल झाले.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलिसांनी पुढील तपासासाठी पथके रवाना केली आहेत. या लुटीत दरोडेखोरांनी लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.
तसेच जोत्सना पाटील यांच्यासोबत घरात असलेल्या त्यांच्या २३ वर्षीय भाचीचे हात मागे बांधून तिला सोबत घेऊन पसार झाले. महिलेने आरडाओरड केल्याने ही घटना उघडकीस आली. याबाबत पोलीस तपास करत आहेत. श्वान पथकाने पेरेजपूरकडे जाणारा माग दाखवला आहे.
या तरुणीच्या मोबाईलचे लोकेशन घटनास्थळापासून काही अंतरापर्यंत मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यामुळे त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, तरुणीला पळविल्याने मोठी खळबळ उडाली आहे.