IND vs AUS: सूर्याच्या ‘या’ चालीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाच्या जबड्यातून हिसकावला विजय, शेवटच्या षटकात रंगला थरार

IND vs AUS: मालिका जिंकल्यानंतर, भारतीय क्रिकेट संघ 3 डिसेंबरच्या रात्री बेंगळुरू येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध (IND vs AUS) 5 वा सामना खेळण्यासाठी आला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील युवा संघाने संपूर्ण मालिकेत कांगारूंना आपल्या पुढे जाऊ दिले नाही.

एम चिन्नास्वामी स्टेडियमवरही असेच दृश्य पाहायला मिळाले. मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून यजमानांना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. श्रेयस अय्यरच्या बळावर भारताने 160 धावा केल्या.

याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला पण शेवटच्या षटकात 10 धावांची गरज असताना अर्शदीप सिंगने केवळ 3 धावा दिल्या ज्यामुळे भारताने 6 धावांनी विजय मिळवला.

भारताची या मालिकेतील 5व्या T20 मध्ये सर्वात खराब सुरुवात झाली. यशस्वी जैस्वाल (21) ने पुन्हा एकदा आपल्या प्रसिद्ध शैलीत मोठे फटके खेळले. मात्र चौथ्याच षटकात त्याला जेसन बेहरेनडॉर्फच्या हाती झेलबाद व्हावे लागले.

दुसऱ्या टोकाला या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा ऋतुराज गायकवाड (10)ही विशेष काही करू शकला नाही. कारण यशस्वीपाठोपाठ तोही पुढच्याच षटकात बाद झाला.

यानंतर सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंगही फ्लॉप ठरले, दोन्ही खेळाडूंनी अनुक्रमे 5 आणि 6 धावा केल्या. रिंकू सिंगची विकेट ऑस्ट्रेलियासाठी सर्वात महत्त्वाची ठरली कारण रिंकूने आपला डाव लवकर संपवण्याची ही पहिलीच वेळ होती.

परिस्थिती अशी होती की 10व्या षटकाच्या आधीच भारताचे चार फलंदाज अवघ्या 55 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले होते.

श्रेयस अय्यरने सतत विकेट पडत असताना एक टोक पकडले होते. रिंकू सिंग बाद झाल्यानंतर जितेश शर्मा त्याला साथ देण्यासाठी आला, त्याने 16 चेंडूत 24 धावा करत भारताच्या डावाला गती दिली.

जितेश आणि श्रेयसमध्ये 42 धावांची भक्कम भागीदारी झाली. ज्यांनी संघाला पुन्हा रुळावर आणण्याचे काम केले. उपकर्णधार अय्यरनेही 37 चेंडूत 53 धावा केल्या. अखेरीस अक्षर पटेलनेही 21 चेंडूत 31 धावांचे योगदान दिले. त्यामुळे भारताने १६० धावांचा आकडा गाठला.

161 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने आश्वासक सुरुवात केली. सध्या आयुष्यातील सर्वोत्तम फॉर्ममध्ये खेळत असलेल्या ट्रॅव्हिस हेडने पहिल्याच चेंडूपासून भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवला.

अर्शदीप सिंगच्या पहिल्याच षटकात त्याने 14 धावा दिल्या. इथून भारत पिछाडीवर पडला होता, पण त्यानंतर आवेश खान आणि मुकेश कुमार यांनी सातत्यपूर्ण गोलंदाजी करत पुनरागमन केले.

अवेशने दुसऱ्या षटकात केवळ 4 धावा दिल्या आणि त्यानंतरच्याच षटकात मुकेशने जोश फिलिपला पायचीत केले. यानंतर फिरकीपटूंनी आपली पकड घट्ट केली.

ज्यामध्ये रवी बिश्नोईने पुन्हा एकदा धोकादायक दिसत असलेल्या ट्रॅव्हिस हेडला (28) पहिल्याच षटकात बाद केले. पुढच्याच षटकात त्याने अॅरॉन हार्डीला (6) बाद करत सामन्यावरील भारताची पकड मजबूत केली.

भारतीय फिरकीपटूंनी कहर करूनही बेन मॅकडरमॅटने एका टोकाकडून धावा सुरूच ठेवल्या. 15 व्या षटकापर्यंत फलंदाजी करताना त्याने 36 चेंडूत 54 धावांची शानदार खेळी केली.

पण त्याला अर्शदीप सिंगने बाद केले, त्यानंतर मॅथ्यू शॉर्टने डावाची धुरा सांभाळत ऑस्ट्रेलियाला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली. पण 2 षटकांच्या विश्रांतीनंतर मुकेश कुमार आला आणि त्याने मॅथ्यू शॉर्ट आणि बेन ड्वार्शविस यांना 2 चेंडूत बाद केले.

इथून सामन्याचा समतोल पूर्णपणे भारताच्या बाजूने दिसत होता पण पुढच्याच षटकात आवेश खानने 3 चौकार मारले आणि शेवटच्या 2 षटकात ऑस्ट्रेलियाला 17 धावांची गरज होती.

यानंतर शेवटच्या षटकात फक्त 10 धावा शिल्लक होत्या. त्या वाचवण्यात अर्शदीप सिंगने कोणतीही कसर सोडली नाही आणि भारताने 6 धावांनी विजय मिळवला.