रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे भयानक घटना घडली आहे. याठिकाणी रात्री सर्व गाव झोपेत असताना दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत १२० पेक्षा जास्त लोक हे ढिगाऱ्याखाली अडकले आहे.
मध्यरात्री ही घटना घडली होती. त्यानंतर तातडीने बचावपथक तिथे दाखल झाले असून त्यांनी बचावकार्याला सुरुवात केली आहे. या ढिगाऱ्यातून २७ लोकांना सुखरुपपणे ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. त्यामध्ये दोन-तीन लहान मुलांचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, याठिकाणी ६५ घरांची वस्ती आहे. दरड जेव्हा कोसळली तेव्हा २५ ते ३० घरे उद्ध्वस्त झाली आहे. यामध्ये १२० जण अजूनही ढिगाऱ्याखालीच आहे. तर या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. हा आकडा वाढण्याचीही भिती व्यक्त केली जात आहे.
इतर लोक याठिकाणी येऊ नये म्हणून ३-४ किमीच्या अंतरावर पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. बचावपथक सोडून इतर कोणत्याही वाहनाला आत सोडलं जात नाहीये. तसेच या भयानक घटनेमुळे तिथे गर्दी होत असल्यामुळे पोलिस खबरदारी घेताना दिसत आहे.
सध्या ४० पेक्षा जास्त रुग्णवाहिका या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. तर यातील २० रुग्णवाहिका या आत पाठवण्यात आल्या आहे. तर बाकीच्या रुग्णवाहिका अजूनही बाहेरच आहे. घटनास्थळी जमा झालेले लोक आक्रोश करताना दिसून येत आहे.
आम्हाला आमच्या नातेवाईकांना भेटण्याची परवानगी द्या, असे म्हणत लोक गर्दी करताना दिसून येत आहे. तसेच काही नातेवाईकांनी तर आम्ही आमच्या लोकांना शोधतो आम्हाला आत जाऊद्या असेही म्हटले आहे. पण बचावपथकाशिवाय कोणालाही आत सोडण्यात येत नाहीये.