सध्या गुजरातमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील बामनबोर-कच्छ राष्ट्रीय महामार्गावर काही धनदांडग्यांनी खासगी जमिनीवरुन राष्ट्रीय महामार्ग बायपास करुन एक बोगस टोल नाका उभारला. याबाबत घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
याठिकाणी दीड वर्षे सरकारी अधिकाऱ्यांच्या डोळ्यांमध्ये धूळफेक करत कोट्यवधींचा घोटाळा केला गेला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये ही घटना घडल्याने याची चर्चा सुरू झाली आहे.
येथील मोरबीमध्ये राष्ट्रीय महामार्गाला बायपास करुन खासगी जमिनीवर टोल नाका उभारण्यात आला. या टोलनाक्यावर मालकाने गेल्या दीड वर्षांत बोगस टोल नाक्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावले आहेत. मात्र तोपर्यंत कोणालाही याची माहिती नव्हती.
यामुळे माहिती होती की मुद्द्याम याकडे दुर्लक्ष केले गेले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आरोपींनी यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्हाईट हाऊस सिरॅमिक कंपनीची कंपनी, एक बंद कारखाना आणि वर्गसिया गावातून वळवली.
आरोपी ट्रक चालकांकडून निम्मा टोल घेत होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वाढत गेली. वर्षभरापेक्षा अधिक काळ अशा प्रकारे टोल वसुली केली जात होती. मात्र कोणालाही याबाबत माहिती नव्हती. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, आरोपी ट्रक चालकांकडून २० रुपये ते २०० रुपयांपर्यंत टोल घेत होते. प्रत्यक्षात त्यांच्याकडून वैध टोलनाक्यांवर ११० ते ५९५ रुपये इतका टोल घेतला जातो. या घटनेमुळे गुजरातमध्ये सरकारवर टीका केली जात आहे.