Nagpur News : नागपूरमधील मुंज चौकातील मेट्रो स्टेशनवरून उडी घेत २४ वर्षीय युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे मोठी खळबळ उडाली. या युवकाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. याबाबत तपास सुरू आहे. शुभम बन्नागरे असे युवकाचे नाव आहे.
शुभम हा नागपुरात स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. तो काही दिवसांपासून तणावात होता. तो मुंजे चौकातील मेट्रो स्टेशनमध्ये गेला. तेथून तो फुटओव्हर ब्रीजवर गेला. बँक ऑफ महाराष्ट्राकडे बघायला लागला. याच दरम्यान एका नागरिकाला तो दिसला.
त्याने युवकाला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र शुभमने उडी घेतली. नंतर एका नागरिकाने धंतोली पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच धंतोली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. यावेळी मोठी गर्दी झाली होती.
नंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुभमने उडी घेण्यापूर्वी अनेकवेळा वडिलांच्या मोबाइलवर संपर्क साधला. मी आत्महत्या करीत असल्याचे तो वडिलांना म्हणाला. यामुळे वडील देखील घाबरले होते.
वडिलांनी त्याला समजावले, मात्र शुभमने वडिलांचे ऐकले नाही. उडी घेण्यापूर्वी तो सरिता सरिता असे जोरजोराने ओरडत होता, असेही पोलिसांनी सांगितले. यामुळे सरीता कोण याबाबत तपास सुरू आहे. यामुळे कुटूंबाला एकच धक्का बसला.
त्याच्या पायाला जबर मार लागल्याचे निदान डॉक्टरांनी केले. दरम्यान त्याने असा टोकाचा निर्णय का घेतला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे.