Covid 19 : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर! दिवसभर जळतायत चिता, स्मशानभूमीच्या बाहेर लांबच लांब रांगा…

Covid 19 : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे जगभरची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. संपूर्ण जगभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहे.

यामुळे याकडे दुर्लक्ष करून जमणार नाही. यामध्ये ब्रिटन, चीन आणि अमेरिका या भागांमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. असे असताना चीनमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. याठिकाणी आधीसारखी परिस्थिती बघायला मिळत आहे.

याबाबत माहिती अशी की, डेली स्टारच्या बातमीनुसार, मृत्यू होणाऱ्यांची संख्या इतकी जास्त आहे की, स्मशानभूमी 24 तास सुरू ठेवण्यात आला आहे. दिवसभर याठिकाणी अनेकांचे निधन होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. चीनमध्ये सध्या 118,977 पॉझिटिव्ह प्रकरणं आहेत. यात 7,557 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

धक्कादायक म्हणजे या सर्व मृत्यूंमागे JN.1 हा सब-व्हेरिएंट असल्याचे समोर आले आहे.  अलिकडच्या आठवड्यात वेगवेगळ्या देशांमध्ये JN.1 प्रकाराची प्रकरणं वाढत आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चीनच्या हेनान प्रांतातील स्थानिक वृत्तपत्रांशी बोलताना लोकांनी परिस्थितीची माहिती दिली आहे.

यामध्ये एका व्यक्तीने सरकारी स्मशानभूमी 24 तास खुल्या असून सतत चिता जळत असल्याचा दावा केला आहे. यामुळे याठिकाणी परिस्थिती कशी असेल याचा अंदाज आपल्याला येईल. फ्यूनरल होममध्ये एकूण आठ स्मशानभूमी आहेत. या सर्वांमध्ये 24 तास मृतदेह जळत असतात. 

सरकारी स्मशानभूमी कमी पडू लागल्या आहेत. गेल्या तीन वर्षांत अनेक खासगी स्मशानभूमीही उघडली आहेत. त्याचा व्यवसाय अतिशय वेगाने सुरू आहे. स्थानिक स्मशानभूमींची संख्या सातत्याने वाढतेय. सध्या इतके मृतदेह येतात की, त्यांना अग्नि देण्याची वाट पहावी लागत आहे.