Ambati Rayudu: क्रिकेटमधून संन्यास घेताच राजकारणात उतरला अंबाती रायुडू, ‘या’ पक्षात केला प्रवेश

Ambati Rayudu: हैदराबाद: माजी भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायडू यांनी गुरुवारी विजयवाडा येथील मुख्यमंत्री कार्यालयात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत युवाजन श्रमिका रायथू काँग्रेस पार्टी (वायएसआरसीपी) मध्ये प्रवेश केला.

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री नारायण स्वामी आणि खासदार पेद्दिरेड्डी मिथुन रेड्डी यांनी जगन मोहन रेड्डी यांच्यासह माजी क्रिकेटपटूचे पक्षात स्वागत केले. रायडूने यावर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. आयपीएलदरम्यानच त्याने निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, त्यानंतर तो परदेशी लीगमध्ये खेळताना दिसला.

वायएसआरसीपीच्या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, ‘प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर अंबाती तिरुपती रायडू मुख्यमंत्री वायएस जगन यांच्या उपस्थितीत सीएम कॅम्प ऑफिसमध्ये वायएसआर काँग्रेस पक्षात सामील झाला. उपमुख्यमंत्री नारायण स्वामी आणि खासदार पेद्दिरेड्डी मिथुन रेड्डी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

रायडू लोकसभा निवडणूक लढवणार?
क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर जवळपास महिनाभरानंतर अंबाती रायडूने आंध्र प्रदेशच्या राजकारणातील दुसऱ्या डावाची घोषणा केली होती. ते लोकसभा निवडणूकही लढवू शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

जूनमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले होते की, ‘लोकांची सेवा करण्यासाठी मी लवकरच आंध्र प्रदेशच्या राजकारणात प्रवेश करणार आहे. याआधी लोकांच्या नाडी जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मी विविध भागांना भेटी देण्याचा निर्णय घेतला आहे.

रायुडूची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
अंबाती रायडूने २०१३ मध्ये भारताकडून पदार्पण केले होते. आपल्या 55 सामन्यांच्या एकदिवसीय कारकिर्दीत त्याने 47 च्या सरासरीने 1694 धावा केल्या. यामध्ये 3 शतके आणि 10 अर्धशतकेही आहेत.

रायुडूने भारतासाठी 6 टी-20 सामन्यात 42 धावा केल्या. त्याने 2019 मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. आयपीएलबद्दल बोलायचे झाले तर त्याने 2010 मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले होते.

2018 मध्ये, तो चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील झाला. या काळात रायुडूने 203 सामन्यात 4328 धावा केल्या. त्याने मुंबई इंडियन्ससह तीन आणि चेन्नई सुपर किंग्जसह तीन आयपीएल विजेतेपदे जिंकली आहेत.