Vijayakanth : दुःखद! दिग्गज अभिनेते आणि डीएमडीके पक्षाचे नेते कॅप्टन विजयकांत यांचे निधन…

Vijayakanth : डीएमडीके पक्षाचे संस्थापक, राजकीय नेते आणि लोकप्रिय तमिळ अभिनेते कॅप्टन विजयकांत यांचे निधन झाले आहे. यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चेन्नईमध्ये त्यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोरोनामुळे त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. कॅप्टन विजयकांत डीएमडीके पक्षाचे नेते होते. २० नोव्हेंबरपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

डीएमडीकेचे संस्थापक कॅप्टन विजयकांत यांच्या निधनानंतर सिनेविश्व आणि राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जातो आहे. विजयकांत हे लोकप्रिय तमिळ अभिनेते होते. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी १५४ चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

नदीगर संगम म्हणजेच दक्षिण भारतीय कलाकारांची संघटना (SIAA) मध्ये पदावर असताना त्यांनी दक्षिण चित्रपट उद्योगात क्रांतिकारक बदल घडवून आणले होते. त्यांचे एक मोठे नाव होते. अभिनयाबरोबरच त्यांनी केलेल्या कामांमुळेही ते लोकप्रिय होते.

त्यांनी २००५ मध्ये देसिया मुरपोक्कू द्रविड कळगम नावाच्या पक्षाची स्थापना केली होती. २००६ मध्ये त्यांच्या पक्षाने विधानसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवली आणि एकूण मतदानाच्या १० टक्के मतं मिळविली. २०११ मध्ये डीएमडीकेने एआयडीएमकेनेबरोबर युती करून निवडणूक लढवली आणि ४१ जागांपैकी २६ जागा जिंकल्या होत्या.

तेव्हा त्यांचा पक्ष प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयास आला होता. विजयकांत यांनी २०११ ते २०१६ पर्यंत तामिळनाडू विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केलं होतं. त्यांच्या जाण्याने अनेकांनी दुःख व्यक्त केले. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.