संतापजनक! पैसे नसल्यानं गर्भवतीला रूग्णालयाबाहेर हाकललं; दारातच बाळाचा जन्म, थंडीमुळे मृत्यू

crime: सरकारी रुग्णालयातील निष्काळजीपणाच्या बातम्या सतत येत असतात. आता माणुसकीला लाजवेल असे एक प्रकरण बदायूॅं (उत्तर प्रदेश ) येथून समोर आला आहे. येथे कडाक्याच्या थंडीत एका गर्भवती महिलेला पाच हजार रुपये न दिल्याने जिल्हा महिला रुग्णालयातून धक्के देऊन बाहेर काढण्यात आले. यामुळे गरोदर महिलेने रुग्णालयाच्या गेटवरच बाळाला जन्म दिला. कडाक्याची थंडी आणि उपचाराअभावी बालकाचा जागीच मृत्यू झाला.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, बदायूॅं शहरातील मोहल्ला काबुल पुरा येथे राहणारा रवी शनिवारी सायंकाळी पत्नी नीलम हिला प्रसूतीसाठी जिल्हा महिला रुग्णालयात घेऊन गेला होता. जिल्हा महिला रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याचा आरोप रवी यांनी केला.

कर्मचाऱ्यांनी नीलमला रूग्णालायत घेण्यास नकार दिला. तपासाच्या नावावर पाच हजार रुपये मागितले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे जिल्हा महिला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी गरोदर नीलम आणि तिच्या कुटुंबीयांना धक्काबुक्की केल्याचे सांगितले जात आहे.

नीलमचा पती तिला हॉस्पिटलच्या गेटवर घेऊन गेला, तिथे अत्यंत वेदना जाणवल्यानंतर नीलमने हॉस्पिटलच्या गेटवरच मुलाला जन्म दिला. अति थंडी आणि उपचाराअभावी रुग्णालयाच्या गेटवरच मुलाचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना खडसावले आणि महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ही घटना अतिशय वेदनादायी आहे. या घटनेमुळे बदायूॅंमधील सरकारी रुग्णालयातील निष्काळजीपणा आणि भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हायला हवी. तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये या प्रकारची घटना घडू नये यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. या घटनेमुळे बदायूॅंमधील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. नागरिकांनी या घटनेचा निषेध केला आहे.