Nashik News : नुकतीच आपण सर्वानी २०२३ या वर्षाला निरोप दिला. त्यानंतर लगेच २०२४ या नवीन वर्षाचे स्वागत अगदी उत्साहात केले आहे. परंतु या नवीन वर्षात देखील अपघाताचे सत्र काही संपायचे नाव घेत नाही. हायवे आणि अपघात यांचं जणू एक समीकरणच झालं आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला आहे.
भरधाव वेगातील मर्सिडीज कारने भाजीपाला घेऊन जाणाऱ्या आयशरला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच रूट पेट्रोलिंग टीम, टोल प्लाझा रुग्णवाहिका आणि महामार्ग पोलीस घोटी हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदतकार्य सुरू केले.
याबाबत माहिती अशी की, अपघात घडला तेव्हा मर्सिडीज कारमध्ये तीन जण प्रवास करत होते. भरधाव वेगाने कार चालवत असताना कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार आयशरला पाठीमागून धडकली. या धडकेत कारचा चक्काचूर झाला. कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी झाला.
मृत पावलेल्यांमध्ये दोन पुरुष आणि एक महिला असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. जखमी व्यक्तीचे नाव विनायक यादव असून त्याला घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या अपघातामुळे नाशिक-मुंबई महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, मर्सिडीज कारचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाल्याची शक्यता आहे. या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.