Manoj Bajpayee : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट कलाकारांचा विचार केल्यास तुम्हाला त्या यादीमध्ये एका व्यक्तीचं नाव घ्यावंच लागेल आणि ते नाव म्हणजे हरहुन्नरी कलाकार मनोज बाजपेयी हे होय. मनोज बाजपेयी राजकारणात येणार का? अशा चर्चेला सध्या जोर धरत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीकडून मनोज बाजपेयीला तिकिट मिळणार असल्याचीही चर्चा आहे. या सर्व चर्चांवर आता मनोज बाजपेयी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मनोज बाजपेयी यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी राजकारणात येणार असल्याची चर्चा फेटाळून लावली आहे. “ही अफवा कोणी पसरवली? की कोणाला असं स्वप्न पडलं होतं का?” असा प्रश्न त्यांनी या पोस्टमध्ये विचारला आहे. या प्रतिक्रियेतून त्यांनी राजकारणात येण्याची कोणतीही इच्छा नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
मनोज बाजपेयी बिहारमधील पश्चिमी चंपारण लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. पश्चिमी चंपारण हे मनोज बाजपेयींचं जन्मस्थान आहे.
या चर्चांना सुरुवात झाली 2022 मध्ये. त्या वर्षी मनोज बाजपेयी यांनी बिहारमध्ये आरजेडी सुप्रिमो लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मनोज बाजपेयीच्या निवडणूक लढवण्याच्या चर्चांना सुरुवात झाली.
पश्चिमी चंपारण लोकसभा मतदारसंघात 2009 पासून भाजपाचं वर्चस्व आहे. भाजपचे संजय जायस्वाल सलग तीनवेळा या मतदारसंघातून निवडून आलेत. त्यामुळे भाजपाचा पराभव करायचा असेल तर मनोज बाजपेयी शिवाय पर्याय नाही हे इंडिया आघाडीला माहिती आहे.
मनोज बाजपेयी यांनी अभिनय क्षेत्रात अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना 2019 मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. मनोज बाजपेयी यांच्या राजकारणात प्रवेशाच्या चर्चांमुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, मनोज बाजपेयी यांनी स्वतःच या चर्चांना फेटाळून लावल्याने या उत्सुकतेला पूर्णविराम मिळाला आहे.