Sharad Mohol : पुणे शहरातून काल एक मोठी बातमी समोर आली. याठिकाणी भरदिवसा गोळीबार झाला. पुण्यातील उच्चभ्रू रहिवाशांचा परिसर असलेल्या कोथरूड परिसरात हा गोळीबार झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे. या घटनेत शरद मोहोळ याला तीन गोळ्या लागल्या. यामध्ये रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, घटनेनंतर पोलिसांनी याठिकाणी धाव घेतली. कोथरूडमधील सुतारदरा परिसरात ही घटना घडली.
आता याबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्याच्या साथीदाराने त्याचा गेम वाजवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर याचे नाव समोर आले होते. पोलीस तपासात एक चक्रावणारी माहिती समोर आली आहे.
आरोपी मुन्नाचे शरद मोहोळसोबत मोठे वाद झाले होते. जमिनीवरून आणि आर्थिक गोष्टीवरून दोघांमध्ये वाद झाले होते. याच वादातून आरोपी मुन्ना याने शरद मोहोळ याची हत्या करण्याचा कट रचला गेला. कोथरुड परिसरातील सुतारदरा या ठिकाणी दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी शरद मोहळ याच्यावर तीन गोळ्या झाडल्या.
हत्येनंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आठ जणांना सातारा रस्त्यावरील शिरवळ जवळून अटक केली आहे. मुठा खोऱ्यातील गुन्हेगारी वर्चस्ववादातून हा खून झाला आहे. नामदेव कानगुडे उर्फ मामा हा या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचे सांगितले जात आहे.
पोळेकरसह दोन जणांना मोहोळ टोळीत महिनाभर आधी घुसवून ही हत्या करण्यात आली. शरद मोहोळचा खून करणारा मुन्ना कोळेकर महिन्याभरापासून शरद मोहोळकडेच काम करत होता. दोघे सोबत असायचे.
टोळीचा सदस्य म्हणून तो त्याच्या सोबत होता. असे असताना पैशांवरून दोघांमध्ये वाद उडाला होता. यामुळे त्याने हे कृत्य केले आहे. घटनेदिवशी सकाळपासून ते सोबत असल्याची माहिती मिळाली आहे. सोबत त्यांनी जेवण देखील केल्याचे सांगितले जात आहे.