Mumbai Cricketer Dies: सामना सुरु असताना डोक्यात चेंडू लागून क्रिकेटपटूचा मृत्यू; मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai Cricketer Dies: क्रिकेट हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. या खेळाची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. पण हा खेळ जितका चांगला आहे तितकाच धोकादायक आहे. चेंडू बॅटऐवजी शरीराच्या इतर कोणत्याही भागाला लागला तर तो जीवघेणा ठरू शकतो. इतिहासात अनेक खेळाडूंना आपला जीव गमवावा लागला आहे आणि अशीच एक घटना पुन्हा घडली आहे, ज्याने लोकांचे हृदय हेलावले आहे.

माटुंगा येथील दादरकर मैदानावर सोमवारी दुपारी एका दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत एका 52 वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. जयेश सावला असे मृत्यूव झालेल्या खेळाडूचे नाव आहे.

जयेश सावला एका टी-20 स्पर्धेमध्ये खेळत होते. सामना सुरू असताना, जवळच्याच मैदानावरून एक चेंडू आला आणि सावला यांच्या डोक्यात लागला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये अशा घटना यापूर्वी घडल्या आहेत.

सावला हे फिल्डिंग करत असताना ही घटना घडली. चेंडू त्यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला लागला आणि ते बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दोन्ही सामने कच्छी व्हिसा ओखल विकास लीजंड कप स्पर्धेतील होते. ही स्पर्धा 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या क्रिकेटपटूंसाठी आयोजित केली जाते.

जागा मर्यादित असलेल्या शहरात एकाच मैदानावर अनेक क्रिकेट सामने आयोजित केले गेले. यापूर्वी या सामन्यांमध्ये खेळाडू जखमी झाल्याची बातम्या आल्या असल्या तरी एखाद्याचा मृत्यू होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे.

पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. त्यांनी शवविच्छेदन करण्याचे आदेश दिले आहेत. मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेने क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त केली आहे. सावला हे एक अनुभवी क्रिकेटपटू होते आणि त्यांच्या निधनाने क्रिकेट जगाला मोठा धक्का बसला आहे.