Sharad Mohol : मोठी बातमी! शरद मोहोळ हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांकडून प्लँचेटचा वापर, भयंकर माहिती आली समोर…

Sharad Mohol News : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात पोलिसांना नवीन दिशा मिळाली आहे. मुन्ना पोळेकरने फायरिंग करताना केलेल्या घोषणेबाजीमुळे पोलिसांना गँगवारचा संशय निर्माण झाला आहे. पोलिस आता या प्रकरणाचा गँगवारच्या दृष्टीने तपास करत आहेत.

शुक्रवारी, ५ जानेवारी रोजी पुण्यातील कोथरूड परिसरात असलेल्या सुतारदराजवळील शरद मोहोळ यांच्या केबल ऑफिससमोर त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात शरद मोहोळचा जागीच मृत्यू झाला होता.

पोलिसांनी या प्रकरणात साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, विठ्ठल गडले, अमित उर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गाव्हणकर आणि दोन अॅड. रवींद्र पवार आणि संजय उडान अशा आठ आरोपींना अटक केली आहे.

दरम्यान, पोलिस ‘प्लँचेट’ही करतात, असा आरोप बचाव पक्षाचे वकील केतन कदम यांनी युक्तिवादादरम्यान केला. त्यावर ‘या गुन्ह्याच्या तपासात कोठेही ‘प्लँचेट’चा वापर केलेला नाही, ही बाब बचाव पक्षाच्या वकिलांच्या आरोपामुळे नोंदीवर घ्यावी,’ अशी विनंती तपास अधिकारी सुनील तांबे यांनी केली. सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव यांनीही बचाव पक्षाचे आरोप खोडून काढले आहेत.

पोलिसांच्या तपासात आढळून आले की, मुन्ना पोळेकर आणि शरद मोहोळ यांच्यात आर्थिक आणि जमिनीच्या व्यवहारांवरून वाद होते. या वादात मुन्ना पोळेकरच्या मामाचे आर्थिक नुकसान झाले होते. म्हणूनच मुन्ना पोळेकरने शरद मोहोळची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.

मात्र, मुन्ना पोळेकरने फायरिंग करताना दुसऱ्या एका कुख्यात गुंडाच्या नावाने घोषणाबाजी केली होती. या घोषणेबाजीमुळे पोलिसांना गँगवारचा संशय निर्माण झाला आहे. पोलिसांनी आता या प्रकरणाचा गँगवारच्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. पोलिसांना या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक करण्याची शक्यता आहे.