मुलगा दोन दिवस बेपत्ता, सगळीकडे शोधले, नंतर वडिलांच्या कारखान्याच्या बॉयलरमध्ये जॅकेट अन्…

भोपाळ येथील बैतुल बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धानोरा गावाजवळील राईस मिलमध्ये मंगळवारी तन्मय नावाच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह त्याच्याच वडिलांच्या कारखान्याच्या बॉयलरमध्ये आढळून आला आहे.

हा मुलगा रविवारी संध्याकाळपासून बेपत्ता होता. त्याचे कुटुंबीय आणि पोलिस त्याचा शोध घेत होते. पण, त्याचा मृतदेह त्याच्याच वडिलांच्या कारखान्यात सापडला. याबाबत तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.

यावेळी कुटूंबाने एकच आक्रोश केला. दरम्यान, राईस मिलचे ऑपरेटर दीपक मशीन सुरू करणार असताना त्यांनी बॉयलर तपासले असता त्यांना तन्मय साहूचे जॅकेट त्यात दिसले. यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी लगेच सगळ्या मशीन बंद केल्या.

त्यांनी इतरांना याबाबतची माहिती दिली. त्यांना बॉयलरच्या आत डोकावून पाहिले तेव्हा त्यांना तन्मयचा मृतदेह तांदळाच्या खाली गाडलेला दिसला. त्यानंतर तन्मयचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

कुटूंबाला देखील याबाबत माहिती देण्यात आली. अनेकदा तन्मय त्याच्या वडिलांसोबत मिलमध्ये यायचा आणि इथे खेळायचा. रविवारी संध्याकाळी त्याला शेवटचे पाहिले गेले होते.

दरम्यान, याठिकाणी तो बॉयलरमध्ये पडला आणि तांदळाच्या पोत्यांखाली दबून त्याचा मृत्यू झाला असे म्हटले जात आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. सातव्या वर्गात शिकणारा १४ वर्षीय तन्मय साहू हा राईस मिल ऑपरेटर पुष्पेंद्र साहू यांचा मुलगा आहे.