मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या जयंत सावरकरांचे निधन, ८८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनामुळे संपुर्ण मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एका प्रसिद्ध मराठी कलाकाराचे निधन झाले आहे. अभिनेते जयंत सावरकर यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले आहे.

मराठी नाटक, चित्रपट, मालिका, ओटीटी अशा सर्व प्लॅटफॉर्मवर त्यांनी काम केले होते. त्यांच्या निधनामुळे संपुर्ण मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. जयंत सावरकरांचे ठाण्यातील रुग्णालयात निधन झाले आहे.

२५ जुलैला जयंत सावरकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. जयंत सावरकर यांच्या जाण्याने त्यांच्यासोबत काम केलेल्या कलाकारांनाही धक्का बसला आहे. त्या कलाकारांनी जयंत सावरकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

जयंत सावरकरांनी तब्बल ४ दशकं मराठी मनोरंजनसृष्टीत काम केले होते. त्यांच्या दमदार अभिनयामुळे त्यांना नाटकं, मालिका, चित्रपटमध्ये संधी मिळत होती. त्यांनी वयाच्या २० व्या वर्षापासून अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.

३ मे १९३६ मध्ये गुहागरमध्ये जयंत सावकर यांचा जन्म झाला होता. त्यानंतर लहानपणापासूनच त्यांना नाटक पाहण्याची हौस होती. त्यामुळे २० व्या वर्षापासून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. त्यांनी १०० पेक्षा जास्त नाटकांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत.

तसेच अनेक मराठी चित्रपटांशिवाय त्यांनी ३० पेक्षा जास्त हिंदी चित्रपटांमध्येही काम केलेले आहे. ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी तर त्यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यांनी समांतरसारख्या वेबसिरीजमध्ये काम केले होते. तसेच त्यांची आई कुठे काय करते? ही मालिका खुप गाजलेली आहे.