Parbhani Crime: पार्टनरशिपमध्ये ट्रॅक्टर घेतला, क्षुल्लक वादातून पार्टनरनेच पार्टनरला संपवलं, उडाली खळबळ..

Parbhani Crime: परभणीच्या पारवा शिवारामध्ये एक मानवी सांगाडा असल्याची बातमी पोलिसांच्या हाती लागली. यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी सदरील सांगाडा व परिस्थितीची पाहणी केली. यादरम्यान खून, घातपात दिसून आला.

नंतर मानवी सांगाड्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात केली होती. नंतर पोलिसांना धक्कादायक प्रकार समजला. मयताच्या वडिलांना दोन लाख पाच हजार रुपये उसने दिले होते. त्याचबरोबर मयतासोबत पार्टनरशिप मध्ये ट्रॅक्टरही घेतले होते.

दोघेजण मिळून व्यवसाय करत असतानाच वडिलांना दिलेल्या उसण्या पैशावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर खुनात झाले आहे. मयताचे नाव हुसेन उर्फ अल्ताफ अकबर शेख असे आहे. आरोपीचे नाव शेख उमर शेख रसूल असे आहे.

आरोपींचा शोध घेत असताना सदरील गुन्हा आरोपी शेख उमर शेख रसूल याने केला असल्याची बातमी पोलिसांना कळाली. आरोपी शेख उमर शेख रसूल यास पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे सांगितले.

आरोपी शेख उमर शेख रसूलने सांगितले की, मी आणि अल्ताफ शेख दोघेजण मिळून पार्टनरशिपमध्ये ट्रॅक्टर घेतले होते. तसेच त्याच्या वडिलांना मी दोन लाख पाच हजार रुपये उसने दिले होते.

असे असताना उसने दिलेले पैसे परत मिळत नव्हते. त्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले आणि त्याचा खून केला’, असल्याची कबुली आरोपीने दिली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.