एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये तरुणाच्या डोक्यात बंदुकीची गोळी होती. मात्र त्याला याची कोणतीही कल्पना नव्हती. तो पूर्णपणे अनभिज्ञ होता. त्याने ४ दिवस पार्टी केली. ३०० किमी प्रवास केला. नंतर याबाबत धक्कादायक माहिती समोर आली.
याबाबत माहिती अशी की, नववर्षाची पार्टी करत असताना या तरुणाच्या डोक्याला गोळी लागली. मात्र याची कल्पना जराही त्याला नव्हती. तो पार्टी करतच राहिला. ही घटना ब्राझिलच्या रियो दि जनेरोमधील आहे. येथील मॅटियस फॅसियो नावाचा तरुण मित्रांसोबत नववर्षानिमित्त पार्टी करत होता.
यावेळी डोक्याला काहीतरी लागले. मात्र छोटासा दगड लागला असेल असे त्याला वाटले. नंतर रक्तस्राव सुरू झाला. एखादा दगड वगैरे लागला असावा असा फॅसियोचा समज झाला. त्यांनी रक्तस्राव सुरू असलेला भाग पुसला आणि तिथे बर्फ लावला. काही वेळात रक्तस्राव थांबला.
नंतर त्याने पार्टी सुरूच ठेवली, त्यानंतर तो कारनं घरी गेला. त्याने स्वत: ३०० किलोमीटर कार चालवली. पुढचे दोन दिवस तो कामाला गेला. नंतर मात्र त्याला अशक्तपणा जाणवू लागला. त्याचा डावा हात दुखू लागला. काही वेळातच हात सुन्न पडला. त्यामुळे तो रुग्णालयात गेला.
डॉक्टरांनी सिटी स्कॅन करुन पाहिलं. फॅसियोच्या डोक्यात बंदुकीची गोळी अडकली होती. सिटी स्कॅनचा रिपोर्ट पाहून डॉक्टरांना धक्काच बसला. आपल्याला गोळी लागलीय याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन गोळी काढली आणि फॅसियोला पुनर्जन्म मिळाला. मात्र यामुळे त्याला मोठा धक्का बसला.
डोक्यात ९ मिमीची बुलेट होती. कमी धोका असलेल्या भागात अडकली होती. पण भविष्यात यामुळे संक्रमणाचा धोका होता. मृत्यू होण्याची दाट शक्यता होती. सध्या फॅसियो ठीक असून त्याची प्रकृती सुधारत आहे. याची चर्चा सध्या सुरू आहे.