Accident Video : ओडिशामधील जगदलपूर जिल्ह्यात शुक्रवारी दुपारी एक भीषण अपघात झाला. एका वेगाने जाणाऱ्या एसयुव्हीने ओव्हरटेक करताना रिक्षा आणि दुचाकीला धडक दिली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 3 जण जागीच ठार झाले, तर 4 जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. त्यानुसार, रस्त्यावरून नियमितपणे वाहतूक सुरु होती. यादरम्यान सिंगल लेनमधून निघालेली एक स्कॉर्पिओ वेगाने येते. स्कॉर्पिओची पुढे लोकांनी भरलेली एक रिक्षा होती. तसंच विरुद्ध दिशेने एक ट्रॅक्टर जात असतो.
स्कॉर्पिओ वेगात असतानाच चालक रिक्षाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतो. पण या प्रयत्नात समोर वेगाने येणाऱ्या दुचाकीला ती धडकते. हा वेग इतका जबरदस्त होता की, स्कॉर्पिओच्या चालकाचं नियंत्रण सुटतं आणि पुढच्या रिक्षालाही धडकते.
यामुळे रिक्षा पलटी होऊन रस्त्यावरुन खाली उतरते. दरम्यान घसरत जाताना स्कॉर्पिओ आणखी एका दुचाकीला उडवते. फक्त 2 ते 3 सेकंदात हे सगळं घडतं.अपघात इतका भीषण होता की, रस्त्याच्या शेजारी बसलेल्या काही लोकांनाही काही कळत नाही.
दुचाकीस्वार तर धडकेमुळे रस्त्यावरच कोसळलेले दिसत आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसर, रिक्षात एकूण 15 जण होते. अपघातात 3 जण जागीच ठार झाले. तर इतर चौघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताचा CCTV फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फुटेज पाहून अंगाचा थरकाप उडेल. दरम्यान या अपघानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.