भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ! क्रिकेटपटूंच्या बॅगमध्ये आढळल्या दारूच्या बाटल्या, चौकशी सुरू..

भारतीय क्रिकेटशी संबंधित मोठी बातमी समोर येत आहे. चंदीगड विमानतळावर सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 23 वर्षांखालील संघाकडे असलेल्या 27 दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या 23 वर्षांखालील संघाच्या 5 क्रिकेटर्सच्या किटमध्ये दारूच्या बाटल्या आणि बिअर सापडल्या आहेत.

ज्या क्रिकेटपटूंकडून दारूच्या बाटल्या आणि बिअर सापडले ते सीके नायडू ट्रॉफीमधील सौराष्ट्रच्या 23 वर्षांखालील संघातील आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. 25 जानेवारीला सौराष्ट्र संघाने सीके नायडू ट्रॉफीमध्ये यजमान चंदीगडचा पराभव केला.

यानंतर सौराष्ट्रचे क्रिकेटपटू राजकोटला परत जात असताना चंदीगड विमानतळावर कार्गोमध्ये ठेवण्यापूर्वी किटची तपासणी करण्यात आली, यावेळी एकच गोंधळ उडाला. सौराष्ट्रातील 5 क्रिकेटपटूंकडे 27 दारूच्या बाटल्या आणि 2 बिअरच्या बाटल्या सापडल्या.

याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र या घटनेने भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. यानंतर सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने एक निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे की चंदीगडमध्ये एक कथित घटना घडली आहे जी सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निदर्शनास आणून दिली आहे.

कथित घटना दुर्दैवी आणि असह्य आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची नैतिकता/ शिस्तपालन समिती आणि सर्वोच्च परिषद या घटनेची सखोल चौकशी करेल आणि योग्य शिस्तभंगाची कारवाई करेल.

दरम्यान, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव हिमांशु शाह यांनी क्रिकेट खेळाडूंच्या किट बॅगेत दारुच्या बाटल्या सापडल्याच्या प्रकरणाबाबत माहिती दिली. याप्रकरणी चौकशी सुरु असून पूर्ण माहिती आल्यानंतर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितले.