nashik crime : पतीला बिअर पाजून मारहाण करून त्यानंतर सर्पदंश करून खुनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पत्नीसह तिची मैत्रीण आणि सर्पमित्रालाही अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित पत्नीचे नाव एकता उर्फ सोनी विशाल पाटील (वय ३६) आहे. तिने तिच्या पतीला मारण्यासाठी तिच्या मैत्रीण माधुरी संतोष कुलकर्णी (वय ३६) आणि सर्पमित्र चेतन प्रवीण घोरपडे (वय २१) यांच्या मदती घेतली.
२७ जानेवारी रोजी बोरगड येथील रहिवाशी विशाल पाटील यांच्यावर हा हल्ला झाला. पत्नी एकता हिने विशालला बिअर पाजून मारहाण केली आणि त्यानंतर चेतन याला बोलावून त्याच्याकडून विशाल यांना सर्पदंश करवून घेतला. या हल्ल्यात विशाल गंभीर जखमी झाला.
तपासात असे समोर आले की, एकता आणि माधुरी यांच्यात बालपणीपासून मैत्री आहे आणि त्यांच्यात ‘विशेष जवळीक’ असल्याचेही समोर आले आहे. एकता हिने पतीकडे वेळोवेळी मालमत्तेसह अतिखर्चाकरीता तगादा लावला होता. त्यातून पती-पत्नीत सतत वाद व्हायचे. या वादांमुळे एकता आणि माधुरी यांनी एकत्रित येत विशालच्या खुनाचा कट रचला आणि चेतनची मदत घेतल्याचे समोर आले आहे.
चेतन हा लातूरमधील रहिवाशी आहे आणि माधुरीची ओळख आहे. दोघेही एकाच ठिकाणी काम करीत असल्याचे समजते. चेतन याने माधुरीला आई मानले होते आणि माधुरीने त्याला बुलेट भेट दिली होती. माधुरीने चेतन याला एकताच्या पतीचा खून करण्यासाठी तयार केले आणि एकताने माधुरीला बंगल्याचे ‘लोकेशन’ पाठविले.
या ‘लोकेशन’द्वारे संशयित चेतन हा लातूरवरुन म्हसरूळमध्ये पोहोचला. रात्री एकताच्या घरात शिरल्यावर त्याने पाठीवरील ‘सॅक’मधून घोणस हा अतिविषारी सर्प काढून विशालला मारहाण करीत सर्पदंश करायला लावला. त्यानंतर एकता आणि चेतन हे दोघे बुलेटवरून लातूरला माधुरीच्या घरी पोहोचले.
चेतन हा पोलिस भरती व इतर शासकीय भरतीची तयारी करीत होता. काही दिवसांपूर्वी माधुरीच्या घराजवळ साप निघाला होता आणि चेतन याने त्याला पकडून एका बरणीत ठेवला होता. माधुरीने एकताकडून वेळोवेळी पतीसोबतच्या भांडणाबाबत ऐकले होते आणि सर्पदंशाद्वारे विशालचा काटा काढण्याचा कट त्यांनी रचला. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न आणि इतर गुन्ह्यांचे आरोप दाखल केले आहेत.