abhishek ghosalkar death : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर आज गोळ्या झाडण्यात आल्या. गोळी लागल्यानंतर त्यांना तातडीने करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला. मुंबई पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा याने गोळी झाडल्याचे वृत्त आहे. तसेच हल्ल्यानंतर मॉरिसने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. दरम्यान, या हृदयद्रावक घटनेने दहिसर हादरले असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. रुग्णालयाचा परिसर सील करण्यात आला आहे.
अभिषेक घोसाळकर यांना मॉरिस नावाच्या व्यक्तीने एका कार्यक्रमासाठी त्यांच्या कार्यालयात बोलावले होते. मॉरिसने हा कार्यक्रम त्याच्या फेसबुकवर लाईव्ह-स्ट्रीम केला. फेसबुक लाईव्हवरील संभाषण संपल्यानंतर, मॉरिस उठून बाहेर पडले. यानंतर अभिषेक घोसाळकर लाईव्हच्या माध्यमातून बोलत होते.
“ही एक सुरुवात आहे. आम्हाला अजून खूप काम करायचे आहे,” असे अभिषेक घोसाळकर यांनी फेसबुक लाइव्हवर सांगितले. त्यांचे संभाषण संपताच अभिषेक घोसाळकरही त्यांच्या जागेवरून उभे राहिले. ते उठताच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
गोळीबार झाला तेव्हा अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे गोळीबार होताच याबाबतची माहिती अभिषेक घोसाळकर यांचे वडील व माजी आमदार विनोद घोसाळकर यांना देण्यात आली.
विनोद घोसाळकर, अनंत गिते, माजी नगरसेवक बाळकृष्ण गोळीबाराची घटना समजताच घटनास्थळी पोहोचले. तसेच अभिषेक घोसाळकर यांना तातडीने जवळच्या करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कोण होते अभिषेक घोसाळकर? ठाकरे गटनेते व माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे ते पुत्र होते. विनोद घोसाळकर 2009 ते 2014 पर्यंत आमदार होते.
एएनआयच्या वृत्तानुसार, मॉरिस नोरोन्हा याने अभिषेक घोसाळकरवर गोळी झाडली आणि त्यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
मॉरिस कोण होता? हा इसम दहिसर उर्फ मॉरिस हा बोरिवली परिसरात एक स्वयंसेवी संस्था चालवतो, असे सांगण्यात येते. मॉरिस नावाचा माणूस स्थानिक राजकीय वर्तुळात स्वयंभू नेता म्हणून ओळखला जात असे. मॉरिस हा गणपत पाटील नगरमध्ये काम करायचा.