ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकरांचा गोळीबारात मृत्यू, घटनेमागील धक्कादायक कारण आले समोर

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर आज गोळीबार करण्यात आला होता. गोळीबारानंतर त्यांना तत्काळ करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत.

अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा याने गोळीबार केल्याची माहिती दिली. हल्ल्यानतंर मॉरिसने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली. घटनेनंतर याठिकाणी पोलीस दाखल झाले असून वातावरण तणावाचे आहे. या धक्कादायक प्रकारामुळे दहिसर हादरले आहे.

सध्या रुग्णालय परिसर सील करण्यात आला आहे. अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस नोरोन्हा हे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत. त्यांच्यात काही वैयक्तिक वाद झाले होते, असेही सांगितले जात आहे.

नंतर ते मिटल्यानं ते एकत्र आले होते. अभिषेक यांना मॉरिसनं स्वतःच्या कार्यालयात बोलावलं आणि फेसबुक लाईव्हही केलं. त्यावेळी या दोघांनीही एकमेकांचं कौतुक केले. मात्र या धक्कादायक घटनेने सगळेच हादरले असून सध्या गोळीबाराच्या अनेक घटना समोर येत आहेत.

दरम्यान, यामागील धक्कादायक कारण समोर आले आहे. मॉरिस हा एका गंभीर गुन्ह्यात तुरुंगात गेला होता. अभिषेक घोसाळकर यांच्यामुळेच आपल्याला तुरुंगात जायला लागलं, असा त्याचा समज होता.

नंतर तुरुंगातून सुटून आल्यानंतर मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांच्याशी मैत्री केली. मात्र त्याच्या मनात राग होताच. आज एका कार्यक्रमाला घोसाळकर यांनी आमंत्रित करून तिथेच त्यांच्यावर मॉरिसने गोळीबार केला. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.