राज्यात दररोज गोळीबाराच्या घटना घडत आहेत. यामुळे अनेकांचे जीव जात आहेत. दोन दिवसांपूर्वी दहीसर गोळीबारामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू असल्याची घटना ताजी असताना आता जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव येथे गोळीबार प्रकरणात गंभीर जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून गोळीबाराच्या घटनेनंतर महेंद्र मोरे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते, मात्र उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
याबाबत माहिती अशी की, ७ फेब्रुवारीला मोरे हे आपल्या कार्यालयामध्ये बसलेले असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. काही तरुण तोंडाला रुमाल बांधून आले आणि या पाचही आरोपींच्या हातामध्ये पिस्तूल होते.
ते पाचही आरोपी भाजपच्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयात घुसले आणि त्यांनी माजी नगरसेवकावर गोळीबार केला होता. यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. चाळीसगाव शहरातील हनुमानवाडी या ठिकाणी हा प्रकार घडला होता.
महेंद्र उर्फ बाळू मोरे असे माजी नगरसेवकाचे नाव आहे. या गोळीबाराच्या घटनेत महेंद्र मोरे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. असे असताना मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
गोळीबाराच्या या घटनेमुळे कायदा- सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे. अजून एकाही आरोपीला अटक झाली नाही. फक्त या गोळीबारासाठी वापरलेली गाडी पोलिसांनी जप्त केली. हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींना पकडण्यासाठी विविध पथक तयार केली आहेत.