सध्या राज्याचा राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत. अनेक नेत्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप यांनी शिवसेना ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. यामुळे ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
त्यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनेचे उपनेते व २५ वर्ष आमदार राहिलेले बबनराव तथा नाना घोलप यांनी आज सकाळी आपल्या शिवसैनिक पदाचा राजीनामा दिला. गेल्या अनेक दिवसापासून घोलप हे शिवसेनेला सोडचिठ्ठी देतील या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.
असे असताना मात्र अद्याप त्यांनी कुठल्या पक्षात जाणार हे जाहीर केलेले नाही. मात्र ते शिंदे गटात जातील असे बोललं जातं आहे. याबाबत घोलप म्हणाले की, मी आज माझ्या शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देत आहे.
आजपर्यंत शिवसैनिक म्हणुन मी निष्ठेने काम केले आहे. मला पक्षाने जे जे सांगितले, ते प्रामाणीकपणे केले आहे. पण अचानकपणे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख पदावरुन वरुन मला काढुन मला अपमानीत करण्यात आले. येथे नविन पदाधीकारी नेमले होते. त्यांना ही बदलण्यात आले, हे कितपत बरे आहे.
ज्या सहा विधानसभा संपर्क प्रमुखांनी लेखी कळवले होते, की हे जुने पदाधीकारी कसे बिनकामाचे विकाऊ आहेत. ते लक्षात येऊन सुध्दा त्यांना परत घेऊन पद दिली हे सर्व पाहुन मी अचंबित आहे. याबाबत विचारणा केली तरी काही उत्तर मिळाले नाही.
नेमक माझं काय चुकल ते समजल नाही. माझे वकीली करणारेही गप्प आहे. त्यापेक्षा आपण थाबुंन घेणे महत्वाचे वाटते. म्हणुन मी माझा शिवसैनीक पदाचा राजीनामा देत आहे असे घोलप यांनी स्पष्ट केले आहे.