दौंडमधून दोन भयानक घटना समोर आल्या आहेत. राहू येथे एका परप्रांतीयाची हत्या झाल्याची बातमी समोर आली आहे. तर गलांडवाडी येथे एका व्यक्तीने ग्राईंडरने स्वत:चा जीव घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
या दोनवेगवेगळ्या घटना एकाच परिसरात घडल्या आहे. याप्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहारचा रहिवासी असलेल्या भिमकुमार यादव असे हत्या झालेल्या माणसाचे नाव आहे.
तसेच दुसऱ्या एका व्यक्तीने स्वत:चाच जीव घेतला आहे. त्याचे विपुल रमेश गदरे असे नाव आहे. या दोन्ही घटनांची पोलिसांनी नोंद केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करायलाही सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गलांडवाडी येथे तुळशीराम शेलार यांच्या घराजवळील एका खोलीत काहीतरी विचित्र आवाज झाला. शेलार त्या खोलीत गेले असता तिथे एका व्यक्तीने गळ्यावर ग्राईंडर मारुन स्वत: जीव घेतल्याचे समोर दिसून आले. त्यानंतर शेलार यांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली.
दुसरीकडे राहू येथे आणखी एक भयानक घटना घडली. याठिकाणी भीमकुमार नावाच्या व्यक्तीची एका अज्ञात व्यक्तीने हत्या केली. त्यानंतर त्याला विहीरीत फेकून दिले होते. भीमकुमार हा मूळ बिहारचा असून इथे तो एका गोठ्यात काम करायचा.
अशात सोमवारी नऊ वाजेच्या सुमारास मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. त्यानंतर तिथल्या स्थानिक लोकांनी लगेच याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने तो मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे.