Pune Drugs : नशेत गुंग मुली, उभंही राहता येईना, पिट्याभाईने पुण्याला हादरवणारा व्हिडिओ आणला समोर…

Pune Drugs : मराठी अभिनेते रमेश परदेशी उर्फ पिट्याभाई यांनी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आणला आहे. पुण्याच्या टेकडीवर वॉकला गेलेले असताना परदेशी यांनी फेसबुक लाईव्ह केलं, ज्यात हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पुण्यात पोलिसांनी मागच्या काही दिवसांमध्ये 1800 किलो ड्रग्स जप्त केले आहे.

याच अनुषंगाने हा व्हिडिओ आहे. या ड्रग्सची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल 4 हजार कोटी आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर पुण्यात खळबळ पसरली आहे. या नंतर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या फेसबुक लाइव्हमध्ये पुण्यातल्या टेकडीवर कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनी नशेमध्ये असल्याचं दिसत आहे.

रमेश परदेशी यांना टेकडीवर फिरायला गेले असताना हे धक्कादायक चित्र दिसलं आहे. नशेमध्ये असणारे हे विद्यार्थी अल्पवयीन आहेत. आपण त्यांना रुग्णालयात घेऊन जात असल्याचंही रमेश परदेशी यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्हमध्ये सांगितले आहे.

यामुळे परिस्थिती किती बिकट झाली असल्याचे दिसून येत आहे. ते म्हणाले, दोन्ही मुलींना आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो आहोत, एक मुलगी ठीक आहे दुसरीची आता थोडी बरी होत आहे. नशा करण्याचे प्रमाण पुण्यात वाढले आहे.

या दोन्ही मुली नशेत पडल्या होत्या, अशी माहिती मिळाल्याचंही रमेश परदेशी यांनी सांगितले. माझ्या घरातही एवढीच मुलगी आहे, माझ्या मुलीने असं केलं तर मी कुणाकडे बघायचं? हे पाहून मला घाबरायला होतं, यामुळे याकडे पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे.

प्रत्येक पुणेकराने या सगळ्यावर लक्ष देण्याची गरज आहे, हा विषय गंभीर आहे, येणाऱ्या काळात हा विषय अजूनच गंभीर होईल. यामुळे आता पासूनच याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.