उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते विलास लांडे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा फॅन असल्याची कबुली दिली आहे. भर कार्यक्रमात त्यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. संजय राऊत साहेब मी तुमचा फॅन आहे. सकाळी उठले की कुणालाही नडेश, तुरुंगात जाऊन आले तरी कुणालाही तुम्ही नडता, हे आत जायला घाबरतात.
असे असताना मात्र राऊत साहेब कुणालाही नडतात, त्यामुळे मी तुमचा फॅन आहे. पुण्यात शिवसेनेचे दिवंगत माजी खासदार गजानन बाबर यांच्यावर लिहिण्यात आलेल्या संघर्षयात्री या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रामकृष्ण मोरे सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली.
त्यांच्या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला होता. यावेळी शरद पवार देखील उपस्थित होते. यावेळी खासदार संजय राऊत, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार श्रीनिवास पाटील, संजोग वाघेरे उपस्थित होते. यावेळी विलास लांडे यांनी केलेल्या या भाषणाची चर्चा सुरू आहे.
विलास लांडे म्हणाले, साहेबांच्या काळात साहेबांनी मला महापौर केले. त्यावेळी श्रीनिवास पाटील साहेब आयुक्त होते. खरं आहे ते खरं सांगतो आहे, त्यावेळी जी परिस्थिती होती, वस्तुस्थिती होती, तीच सांगतो आहे.
माझ्या वडिलांनी साहेबांचा फोटो देवघरात ठेवलेला आहे. राजकारणाच्या पलिकडे जाऊन बोलले पाहिजे, ते समाजाला कळले पाहिजे, खरं काय आणि खोटं काय ते सांगण्याचे काम मी करतो, असे लांडे म्हणाले.
दरम्यान, त्यांनी संजय राऊत यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सभागृहात हशा पिकला होता. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यावर ते एकत्र आले होते.