व्हॉट्सअप स्टेटस ठेवणं तरुणाला भोवलं, कोर्टाचा गुन्हा रद्द करण्यास नकार; म्हणाले…

सोशल मीडिया वापरणं हा लोकांच्या जीवनातील आता अविभाज्य भाग बनत चालला आहे. अनेकजण सोशल मीडियावर स्टोरी, स्टेटस ठेवत असतात. पण आता व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे.

वाशिममधील एका व्यक्तीने मार्च महिन्यात व्हॉट्सअपवर एक वादग्रस्त स्टेटस ठेवलं होतं. त्यामुळे त्याच्यावर ऍस्ट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याने नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली होती.

दिलासा मिळवण्यासाठी त्याने कोर्टात याचिका दाखल केली होती. पण नागपूर खंडपीठाने त्या व्यक्तीला दिलासा देण्यास नकार दिला आहे. व्हॉट्सअप स्टेटस ठेवताना जबाबदारीने वागा आणि विचारपूर्वक स्टेटस ठेवा, असे नागपूर खंडपीठाने म्हटले आहे.

व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून संपर्कात असणाऱ्या व्यक्तींपर्यंत पाहिजे तो मेसेज पोहचवला जातो. ते एक परिचित व्यक्तीशी कम्युनिकेशन करण्याचं माध्यम आहे. एखाद्या व्यक्तीने स्टेटस ठेऊन काही मागणी किंवा संवाद साधला तर त्याला इतरांचाही पाठिंबा मिळतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.

तसेच अनेकजण व्हॉट्सअप स्टेटस चेक करत असतात. त्यामुळे काही चुकीची मागणी केली आणि त्याला पाठिंबा मिळाला, तर वाद होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी स्टेटस ठेवताना विचार करुन ठेवलं पाहिजे. जबाबदारीने वागलं पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

याप्रकरणी २७ वर्षीय किशोर नावाच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. स्टेटसमध्ये त्याने ही गोष्ट गुगलवर सर्च करा, असे म्हणत एक आवाहन केले होते. त्यामुळे तक्रारदाराने पोलिसांकडे किशोरविरोधात ऍस्ट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा करण्याची मागणी केली होती.

किशोरने ठेवलेले स्टेटस हे एखाद्या समुदायाच्या भावना दुखावणारे होते. हे स्टेटस अनेकांनी बघितलं होतं. त्यानंतर गणेश भगत याने हे स्टेटस बघितल्यानंतर त्याने आक्षेप घेतला होता. त्याने पोलिस ठाण्यात जात किशोरविरोधात तक्रार दिली होती.