बारामती लोकसभा निवडणुकीत सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि अजित पवार यांचे कट्टर विरोधक विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा पक्की असल्याचे जाहीर केले. यामुळे अजित पवार यांचे टेंशन वाढले आहे.
विजय शिवतारे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आणि वेळही जाहीर केली. मला एकनाथ शिंदे यांनी पक्षातून काढून टाकले तरी मी निवडणूक लढवणारच असेही ते म्हणाले. असे असताना आता अजित पवार गट आक्रमक झाला आहे.
अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी त्याही पुढे जाऊन थेट महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, आमचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात विजय शिवतारे टीका करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आम्ही करत आहोत.
आता शिवतारेंची हकालपट्टी करा, एवढीच आमची मागणी आहे. जर निर्णय घेतला गेला नाही, तर आम्हालाही महायुतीमधून बाहेर पडण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे आता नेमकं काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आम्ही मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत आमचे म्हणणे मांडले आहे. मात्र त्यानंतरही शिवसेनेकडून शिवतारे यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे आम्ही महायुतीत राहावे की नाही? असेही ते म्हणाले. यामुळे अजित पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यामुळे येणाऱ्या काळात बारामती वरून राजकीय वातावरण अजूनच तापणार आहे. येणाऱ्या काळात बारामती अजून मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी अजित पवार यांच्यासाठी देखील अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे.