शिवजयंतीत मोठा राडा! मिरवणुकीवर जोरदार दगडफेक, धक्कादायक माहिती आली समोर…

राज्यात काल शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. असे असताना मात्र जळगाव शहरापासून जवळच असलेल्या शिरसोली येथे शिवजयंती मिरवणुकीवर अचानक दगडफेक झाली. यामुळे याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या दगडफेकीत अनेक पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले. तसेच घटनास्थळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चौकशी केली जात आहे. याठिकाणी दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार सायंकाळी इंदिरा नगर येथून शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली होती.

ही मिरवणूक वराड गल्ली येथे आली असता तेथे काही काळ ढोलताशे बंद करण्यात आले. याठिकाणी अचानक मिरवणुकीच्या दिशेने दगडफेक सुरु करण्यात आली. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. अनेकांच्या अंगावर दगड फेकण्यात आले. दगड कोण फेकत आहे, हे कोणाच्या लक्षात येत नव्हते.

दरम्यान, याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस स्टेशनचे निरीक्षक बबन आव्हाड हे घटनास्थळी सहकाऱ्यांसह दाखल झाले. त्यासोबत दंगा नियंत्रण पथकाने घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले आहे.

घटनेत मंगेश साहेबराव पाटील (वय ३०), बाळू तुळशीराम पाटील (४५), विशाल दिलीप पाटील (२५) यांच्यासह काही पोलीस कर्मचारी आणि ५ ते ६ नागरिक जखमी आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना जबर मार लागला आहे.

घटनास्थळी अजूनही तणावाचे वातावरण आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित हे पोहोचले असून त्यांनी आसपासच्या लोकांची चौकशी सुरू केली आहे.

दरम्यान, जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या संशयितांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. याबाबत अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे मात्र शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत.