औरंगाबादमध्ये मोठा नेता अपक्ष लढणार! महायुतीसह महाविकास आघाडीचे टेंशन वाढले, कोणाला फटका बसणार?

सध्या लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे.

ही लढत होणार असतानाच माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केले. यामुळे आता या निवडणुकीत रंगत वाढली असून आता याचा कोणाला फटका बसणार हे लवकरच समजेल. मात्र यामुळे अनेकांचे टेन्शन वाढले आहे.

याबाबत माजी आमदार हर्षवर्धन म्हणाले की, सर्वसामान्य मराठा समाजाला आरक्षणात न्याय मिळालेला नाही. इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्या मतांमध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत घट होणार आहे. तीनशे गावांनी माझ्या उमेदवारीसाठी सह्यांची मोहीम राबविली आहे.

यासाठी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा देणारा मी एकमेव आमदार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांना तीन लाख ८० हजार मते, खैरे यांना तीन लाख ७० हजार आणि मला दोन लाख ८० हजार मते मिळाली होती, असेही ते म्हणाले.

तसेच मराठा आरक्षणासाठी ज्यांनी काम केले त्यांना पाठिंबा द्या आणि ज्यांनी काम केले नाही त्यांना पाडा असा संदेश मनोज जरांगे यांनी दिला आहे. तसेच आता वंचित बहुजन आघाडी एमआयएमसोबत नाही. शिवसेनेतील फुटीमुळे खैरे यांची मते घटली आहेत.

यामुळे माझ्या मतदानात वाढ होणार आहे. तीनशे गावांनी सह्यांची मोहीम राबवून जरांगे यांच्याकडे माझे नाव सुचविले आहे. लोकांचा पाठिंबा वाढत असल्यामुळे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही निवडणूक आपण जिंकणारच आहे असेही ते म्हणाले.