छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज उदयनराजे भोसले भाजपाकडून साताऱ्यात उमेदवार आहेत. तर, कोल्हापुरातून श्रीमंत शाहू छत्रपती हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत. यामुळे त्यांच्या उमेदवाराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये कोण बाजी मारणार हे लवकरच समोर येईल.
कोल्हापुरात शाहू छत्रपतींविरुद्ध महायुतीकडून संजय मंडलिक निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे, एकमेकांविरुद्ध आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार यात शंका नाही. सध्या उमेदवारी अर्ज भरले गेले असून प्रचार सुरू झाला आहे. यावेळी अर्ज भरताना उमेदवारांनी आपली संपत्ती जाहीर केली आहे.
दोन्ही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे त्यांच्या संपत्तीचे विवरण समोर आले आहे. कोल्हापूरच्या गादीचे वारसदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनीही आपल्या उमेदवारी अर्जासोबत एकूण संपत्तीची माहिती दिली आहे. ते अब्जाधीश उमेदवार असल्याची माहिती समोर आली आहे.
शाहू शहाजी छत्रपती यांच्या नावे स्थावर व जंगम अशी मिळून २९७ कोटी ३८ लाख ०८ हजार रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी संपत्ती विवरणपत्रात नमूद केले आहे. त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे छत्रपती यांच्या नावे ४१ कोटी ०६ लाखांची संपत्ती आहे.
तसेच शाहू महाराजांवर कसलेही कर्ज नाही. शाहू छत्रपतींची १४७ कोटी ६४ लाख ४९ हजार रुपयांची जंगम मालमत्ता, तर १४९ कोटी ७३ लाख ५९ हजारांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी याज्ञसेनीराजे यांच्या नावे अनुक्रमे १७ कोटी ३५ लाख व २३ कोटी ७१ लाखांची जंगम व स्थावर मालमत्ता आहे.
शाहूंकडे १ कोटी ५६ लाखांचे सोन्याचे, तर ५५ लाखांचे चांदीचे दागिने आहेत. शाहू छत्रपतींच्या नावावरील वाहनांची किंमत सहा कोटी आहे. १२२ कोटी ८८ लाख इतक्या किंमतीची शेतजमीन त्यांच्या नावावर आहे. पत्नी याज्ञसेनी यांच्या नावावर सात कोटी ५२ लाख रुपयांची शेतजमीन आहे. शाहू महाराजांचे प्रतिस्पर्धी उमदेवार संजय मंडलिक हेही कोट्यधीश आहेत.