राज्यात सध्या अनेक बड्या पक्षांमध्ये फूट पडली आहे. यामुळे सगळेच संभ्रमात आहेत. गेल्या निवडणुकीत आमनेसामने उभे ठाकलेले पक्ष आता विरोधात उभे आहेत. गेल्या निवडणुकीत सोबत प्रचार केलेले नेते आता एकमेकांवर टीकेचे बाण सोडत आहेत. यामुळे अनेकांची पंचाईत झाली आहे.
काही ठिकाणी नेमकी उलट परिस्थिती आहे. मावळमध्ये अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याठिकाणी महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे रिंगणात आहेत. त्यांनी गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांचा दारुण पराभव केला होता.
हा पराभव अजित पवारांच्या जिव्हारी लागला होता. यावरून आता रोहित पवारांनी अजित पवारांवर टीका केली आहे. ते म्हणाले, मागील निवडणुकीत मावळमध्ये मी पार्थसाठी प्रचार केला. पण दुर्दैवाने त्यांचा मोठा पराभव झाला. याठिकाणी श्रीरंग बारणे विजयी झाले.
लेकाचा पराभव करणाऱ्या बारणेंसाठी आता अजित पवार प्रचार करत आहेत. पण मी भाऊ म्हणून पार्थ यांच्या पराभवाचा बदला घेईन, असा निर्धार रोहित यांनी केला आहे. अजित पवार आता स्वत:च्या लेकाचा पराभव करणाऱ्या बारणेंचा उमेदवारी अर्ज भरण्यास उपस्थित होते.
लेकाचा पराभव त्यांनी पचवला का ते माहीत नाही. पण अजून त्यांना बरंच काही पचवायच आहे. त्यामुळेच ते बारणेंसाठी प्रचार करत आहेत. बारणेंनी पार्थचा केलेला पराभव मी अद्यापही विसरलेलो नाही, असा टोला रोहित पवारांनी अजित पवारांना लगावला आहे.
सध्याची राजकीय परिस्थिती खूप वेगळी आहे. अनेक पक्ष बदलले आहेत, यामुळे काही विरोधक आता एक झाले आहेत तर काही एकत्र असलेले वेगळे झाले आहेत. यामुळे नेत्यांना काय बोलायचं असा प्रश्न उपस्थित होत आहे.