अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा अन् अमित शाह पुण्यात दाखल; झाली महत्वाची बैठक

पुण्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह हे पुण्यात दाखल झाले आहेत. रात्री उशिरा ते पुण्यात आले. त्यानंतर जे डब्ल्यु मॅरिट हॉटेलमध्ये त्यांची राजकीय बैठकही झाली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदन देवीदास यांचे सोमवारी निधन झाले होते. त्यामुळे मदन देवीदास यांच्या अंत्यदर्शनासाठी अमित शाह पुण्यात आले आहे. ते रात्री उशिरा पुण्यात दाखल झाले.

अंत्यदर्शनासाठी पुण्यात आलेले असले तरी हॉटेलमध्ये त्यांची राजकीय बैठक पार पडली आहे. हॉटेलमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा केली आहे.

अजित पवार, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यात नक्की काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहे. त्यावर अमित शाहांनी चर्चा केली असावी असे म्हटले जात आहे.

अजित पवारांनी बंड करत भाजप-शिवसेनेसोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार, नंतर अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चा अशा अनेक घडामोडी राज्यात घडत आहे. त्यामुळे यावर अमित शाह चर्चा करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवार यांच्या एंट्रीने मंत्रिमंडळात अजित पवारांच्या आमदारांनाही स्थान देण्यात आले. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांची काही मंत्रिपदं गेली आहेत. त्यामुळे ते नाराज असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांना अमित शाहांनी समन्वय राखण्याच्या सुचना केल्या आहेत, अशीही चर्चा आहे.