घाटकोपरमध्ये १२० फूट उंच होर्डिंग कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या घटनेत ७० पेक्षा अधिक जण जखमी झाले. १५ हजार चौरस फुटांचे होर्डिंग संध्याकाळी पेट्रोल पंपवर कोसळले.
यावेळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीन घटनेचा थरार सांगितला आहे. यावेळी अंगावर काटा आल्याचे त्यांनी सांगितले आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु असताना ही दुर्घटना घडली. होर्डिंग कोसळल्यानंतर एकच आक्रोश सुरु केला. अडकलेल्यांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला, असेही ते म्हणाले.
ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी तिथे अमित गुपचंदानी कारमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आले होते. पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्या डोळ्यांसमोर भयंकर घटना घडेल याबाबत कोणाच्याही मनात काहीही नव्हते. अचानक अवकाळी पाऊस सुरु झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धूळ उडू लागली. मात्र ही घटना घडेल असं कोणाच्याही मनात नव्हते.
अचानक १०० फूट लांबीचे होर्डिंग पेट्रोल पंपवर कोसळले. व्यावसायिक अमित गुपचंदानी त्यावेळी पेट्रोल पंपवर होते. त्यांच्या डोळ्यांसमोर ही घटना घडली आहे. ते म्हणाले, वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु होता. तितक्यात होर्डिंग कोसळले. काही जण त्याच्या खाली अडकले. आसपासचे लोक सैरावैरा पळू लागले. सुदैवानं मी आणि माझा मित्र थोडक्यात बचावलो.
याठिकाणी काही फुटांवरच आम्ही होतो. आम्ही लगेच अडकलेल्या लोकांची सुटका करु लागलो. जखमींना उपलब्ध वाहनांमध्ये बसवून रुग्णालयात पाठवले, तसेच इतरांना देखील मदतीला बोलावले, याबाबत बचाव यंत्रणेला माहिती दिली. मुख्य भागात ही घटना घडल्याने याठिकाणी लगेच इतरांना माहिती मिळाली.
दरम्यान, होर्डिंग लावताना पालिकेची परवानगी घेण्यात आलेली नव्हती, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. या प्रकरणात पालिकेने होर्डिंग लावणाऱ्या एजन्सीला नोटिस दिली आहे. याबाबत कोणतेही नियम पाळले गेले नसल्याचे सांगितले आहे.