सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान संपले आहे. यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना आता लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 48 पैकी 40 जागा महाविकास आघाडीला मिळणार आहेत, असा दावा राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केला आहे.
त्यांनी निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केला, तर मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही आणि राज्यातील सर्व मतदारांच्या वतीने मी आपला मर्डर करेल, अशी थेट धमकी त्यांनी दिली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत आता पोलीस देखील यावर लक्ष ठेवून आहेत.
याबाबतचे धमकीचे पत्र त्यांनी दिल्ली कार्यालयाला पाठवले आहे. यामुळे सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. माजी महसूल मंत्री तथा अकोला व बुलढाणा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राहिलेले सुबोध सावजी नेहेमी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. अनोखी आंदोलने आणि अधिकाऱ्यांना जनतेच्या प्रश्नासाठी धमक्या देण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत.
त्यांनी याआधी संभाजी भिडे गुरुजी, जिल्हा परिषदेतील अधिकारी यांच्या मर्डरची देखील धमकी दिली होती. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी आता देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त यांनाच धमकी दिल्याची याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
त्यांनी एका ईमेल द्वारे पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, देशात 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात असलेल्या मतदारांचा कौल हा महाविकास आघाडीकडेच आहे. या आधारे 48 जागांपैकी 38 ते 40 लोकसभेच्या जागा या महाविकास आघाडीच्या येणारच. परंतु जनतेच्या व माझ्या मनात संशय आहे की आपण ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून लोकांच्या मतदानाचा लोकशाहीचा का घोटणार आहात.
असे घडल्यास महाराष्ट्रातील मतदारांच्या वतीने या अन्यायाच्या विरोधात मी आपला गळा घोटल्याशिवाय राहणार नाही, असा थेट धमकीचा मेल त्यांनी केला आहे. यामुळे आता त्यांच्याविरोधात नेमकं काय होणार तसेच निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.