पुणे शहरातील कल्याणीनगरमधील पोर्शे कार दुर्घटनेत रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. आता या चालकास बालसुधारगृहात टाकल्यानंतर आता अग्रवाल कुटुंबीयांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये आजोबा, बाप आणि नातू तिघेही तुरुंगात असताना आता त्यांच्या गुन्हेगारीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत.
या पोराचे अपघात प्रकरण दाबण्यासाठी अग्रवाल पिता-पुत्राने शासकीय यंत्रणेवर, पोलिसांवर दबाव टाकला, पैशाचं आमिष दाखवलं हे समोर आलं आहे. याबाबत डॉक्टर देखील अटकेत आहेत. त्यांनी रक्ताचे नमुने बदलले होते. आता अग्रवाल यांनी एका महिलेच्या 10 एकर जमिनीवर बेकायदा ताबा घेतल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत अग्रवाल कुटुंबीयांकडून फसवणूक झाल्याची आणखी दोन प्रकरणे समोर आली आहेत. काही दिवसांपूर्वी सुरेंद्र अग्रवालचे दाऊदच्या निकटवर्तीयाशी संबंध असल्याचे समोर आले होते. आता वडगाव शेरी येथील एका महिलेने अग्रवाल कुटुंबीयांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दरम्यान, शिवसेना नेते अजय भोसले यांनी पुढे येत यापूर्वी अग्रवाल कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली होती. आता दत्तात्रय कातोरे अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करणार आहेत. यामुळे पोलीस याबाबत तपास करत आहेत. आपल्या मुलाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप तक्रारदार दत्तात्रय कातोरे यांनी केला आहे.
या महिलेने पुढे येऊन अग्रवाल कुटुंबीयांवर जमिन हाडपल्याचा आरोप केला आहे. नीता गलांडे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात येऊन अग्रवाल यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. गलांडे यांच्या 10 एकर जागेवर अग्रवाल कुटूंबाने बेकायदेशीर ताबा मिळवल्याचा आरोप या महिलेने केला आहे. यामुळे याचा देखील आता तपास होणार आहे.
दरम्यान, याबाबत देखील पोलिसांनी आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचे या महिलेने म्हटले आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात याबाबत अजून काही माहिती समोर येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून याबाबत आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक झाले आहेत.