अवघ्या 5 वर्षांच्या चिमुकलीचा अटॅकने मृत्यू, आईच्या मोबाईलवर बघत होती कार्टून…

सध्या लहान मुलांना देखील हार्ट अटॅक (Heart Attack) येऊ शकतो. अनेक ठिकाणी यासारख्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. याचाच प्रत्यय देणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील एका 5 वर्षाच्या चिमुकलीला मोबाईलवर कार्टून पाहताना हार्ट अटॅक आला.

यावेळी आईच्या समोर चिमुकलीचा मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. महेश खरगवंशी यांची 5 वर्षांची मुलगी कामिनी बिछान्यात बसली असताना तिने आईचा मोबाईल घेतला. मोबाईलवर ती कार्टून बघत होती. अचानक कामिनीच्या हातातून मोबाईल निसटला आणि तो जमिनीवर पडला.

असे असताना मात्र, बाजूला बसलेल्यांना वाटलं की मोबाईल मुद्दामहून पडला आहे. नंतर मात्र मुलीला अस्वस्थ अवस्थेत पाहिल्यावर आई-वडिलांची तांरबळ उडाली. मुलीला काहीतरी झालं असल्याचे त्यांना जाणवलं. तिला तातडीने गावातील डॉक्टरांना दाखवण्यात आले.

त्याठिकाणी मात्र तिला मृत घोषित करण्यात आलं. यामुळे कुटूंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. हसनपूर कोतवाली परिसरातील हातियाखेडा गावात ही घटना (UP Crime News) घडली आहे. 

हसनपूर कोतवाली परिसरातील हातियाखेडा गावात ही चिमुकली आपल्या आई वडिलांसह राहत होती. मुलीचं नाव कामिनी होते. कामिनी ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर उभा राहिला आहे.

दरम्यान, तिचा पाचवा वाढदिवस 30 जानेवारीला साजरा होणार होता. मात्र त्याआधीच कामिनीच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसलाय. तिच्या अशा प्रकारे जाण्याने कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. हार्टअटॅकने तिचे निधन झाल्याचे सांगितले गेले.