शेतकरी महिला डरकाळी फोडणाऱ्या बिबट्याला भिडली; डब्याची पिशवी गरागरा फिरवली अन्

सध्या बिबट्याचा वावर लोकवस्तीकडे वाढला आहे. यामुळे अनेकांवर हल्ले होत असल्याच्या बातम्या येत आहेत. आता अशीच एक घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये रानात खुरपणीचे काम उरकून घराकडे येणाऱ्या महिलेवर उसाच्या पिकात बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला.

महिलेने मात्र घाबरून न जाता प्रसंगावधान राखत तिने हातातील जेवणाऱ्याच्या डब्याच्या पिशवीलाच ढाल बनविली, आणि बिबट्यालाच माघार घ्यायला लावली. यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. तिच्या प्रतिहल्ल्यामुळे भांबावलेल्या बिबट्याने माघार घेत धूम ठोकली.

सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी गावाच्या काळे वस्ती परिसरात भरदिवसा ही थरारक घटना घडली आहे. त्यांनी दुपारपर्यंत काम केल्यानंतर शेतात त्यांनी जेवण केले. काम आटोपल्यावर आपल्या घराकडे त्या एकट्याच निघाल्या. मात्र घरी जातानाच बिबट्याने त्यांना हेरले होते.

त्यांच्या समोर शेतातून बिबट्या अचानक बाहेर आला. त्याने यांच्यावर हल्ला केला. त्यांनी देखील प्रतिहल्ला करीत बिबट्यासोबत संघर्ष केला. या हल्ल्यात त्यांच्या मान, पाठ आणि हातावर जखमा झाल्या. संगीता लक्ष्मण काळे (वय ४९) असे या धाडसी महिलेचे नाव आहे.

दरम्यान, हल्ला झाल्यानंतर नागरिकांनी याठिकाणी धाव घेतली. नागरिकांनी काळे यांना नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, सिन्नर वन विभागाचे संजय गीते यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी माहिती घेतली.

दरम्यान, काळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी मोठ्या प्रमाणात बिबट्या वस्तीकडे येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना रात्रीचे शेतात जाणे धोक्याचे ठरत आहे. आता दिवसा देखील असे हल्ले होत आहेत. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.