अभिषेक बच्चनची राजकारणात होणार एंट्री, ‘या’ पक्षाकडून लढणार लोकसभा निवडणूक

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आपल्या अभिनयाने नेहमीच चाहत्यांची मने जिंकत असतो. दसवी, ब्रिथ, दिल्ली ६, गुरु, लुडो अशा चित्रपटांमध्ये त्याने जबरदस्त अभिनय केला आहे. त्याचे चाहते नेहमीच त्याच्या चित्रपटांची वाट पाहत असतात.

आता मात्र अभिषेकने एक मोठा निर्णय घेतला आहे. अभिषेकने अभिनयासोबतच राजकारणातही करिअर करण्याचा विचार सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक बच्चन हा पुढच्यावर्षी होणाऱ्या निवडणूकीत उमेदवार असणार आहे.

अभिषेक बच्चन लवकरच अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात सामील होणार आहे. अभिषेक २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रयागराजमधून निवडणूक लढणार आहे. अमिताभ बच्चन यांनीही प्रयागराजमधूनच निवडणूक लढवली होती.

अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करणार तो निवडणूक लढणार अशी चर्चा सर्वत्र होत आहे. पण अभिषेक बच्चन आणि समाजवादी पक्षाकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या बातमीमुळे अभिषेक बच्चन हा त्याच्या वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत असल्याची चर्चा आहे.

अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी काही काळासाठी राजकारणात प्रवेश केला होता. १९८४ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. पण जुलै १९८७ मध्ये त्यांनी राजीनामा दिला. तर जया बच्चन पहिल्यांदा २००४-२००६ मध्ये खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०१८ मध्ये त्या राज्यसभा सदस्य झाल्या.

अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. पण २०१३ मध्ये दिलेल्या मुलाखतीत अभिषेकने राजकीय कारकिर्दीबद्दल वक्तव्य केले होते. तो म्हणाला होता की, माझे आई-वडील राजकारणात आहेत पण मी स्वतःला राजकारणात पाहत नाही. मी पडद्यावर नेत्याची भूमिका साकारू शकतो, पण खऱ्या आयुष्यात नाही. मी कधीही राजकारणात पाऊल ठेवणार नाही.