अजित पवारांनी रोहित पवारांचा हुकमी एक्काच फोडला, बारामतीत मोठ्या घडामोडी…

सध्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे. याठिकाणी दोन्ही नेते जोरदार प्रचारसभा घेत आहेत. यामुळे हा लढतीकडे राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागले आहे. आता प्रचारासाठी अवघे काही दिवस उरले आहेत.

या मतदारसंघात धनगर मतदारांचे मोठं प्राबल्य असल्याने दोन्ही पवारांकडून धनगर नेत्यांना मानाचे पान देण्याचा प्रयत्न सुरू आहे. शरद पवार यांनी अहिल्याबाई होळकर यांचे वंशज असलेले भूषणसिंहराजे होळकर यांना पक्षात प्रवेश दिला. यातून त्यांनी मतांची बेरीज जुळवण्याचे काम केले आहे.

त्यानंतर आता अजित पवार यांनी देखील अहिल्याबाई होळकर यांचे वंशज असलेले अक्षय शिंदे यांना पक्षात प्रवेश देत थेट राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. यामुळे रोहित पवारांसाठी हा मोठा धक्का आहे.

कर्जत जामखेड येथे 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अक्षय शिंदे यांनी रोहित पवार यांना या विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न केले होते. यामुळे आता रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

रोहित पवार यांच्या विजयात अक्षय शिंदे यांचा मोठा वाटा होता. अक्षय शिंदे हे मूळचे चौंडी येथील असून रोहित पवार यांचे कट्टर समर्थक होते. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातच अजित पवार यांनी मोठी खेळी केली आहे. रोहित पवार यांच्या कट्टर समर्थक असलेल्या अक्षय शिंदे यांना आपल्या पक्षात प्रवेश देत रोहित पवार यांना मोठा धक्का दिला आहे.

दरम्यान, अक्षय शिंदे हे धनगर समाजातील एक मोठे नाव आहे. या समाजातील युवकांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव असून त्याचा फायदा अजित पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघात देखील होणार आहे. यामुळे याचा परिणाम काय होणार हे लवकरच समजेल.