Alibaug Crime: आईने जेवण दिले नाही, उच्चशिक्षित लेकाला राग अनावर, पुढे भयंकर घडलं..

Alibaug Crime : जन्मदात्या आईलाच जिवंत जाळून संपवल्याची संतापजनक घटना अलिबाग मधून समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या मुलाने आईकडे जेवण मागितले ते दिले नाही, म्हणून या तरुणाने हे कृत्य केले आहे.

अलिबागमधील सुडकोली नवखार येथे ही घटना घडली आहे. आयटी मधून शिक्षण घेतलेल्या उच्चशिक्षित जयेश खोत या युवकाने जन्मदात्या आईचाच खून केला आहे. जयेश खोत उच्चशिक्षित आहे. मात्र त्याला नोकरी नाही.

तो कधी हॉटेलमध्ये तर कधी खेकडा पकडून विकणे असे मिळेल ते काम करत होता. त्याने आई चांगुणा खोत हिचा अत्यंत निर्दयीपणे खून केला आहे. आईने जेवण दिले नाही म्हणून किरकोळ वाद झाला. रागाच्या भरात जयेशने लाकडी दांडक्याने आईला मारहाण केली.

तसेच त्याने कोयत्याने मारत आईला घराबाहेर काढले. तसेच तिच्यावरती पालापाचोळा टाकून तिला जिवंत जाळले. जवळच्या नागरिकांनी चांगुणा खोत यांना अलिबाग उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, घटनेनंतर जयेश जंगलात पळून गेला. रायगड जिल्हा पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली. मात्र, काळोख पडल्याने शोध मोहीम राबवणे कठीण जात होते. मात्र काही तासांनंतर तो झाडात लपलेला दिसला, नंतर त्याला अटक करण्यात आली.

यावेळी पोलिसांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न त्याने केला. आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी नागरिकांकडून करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. या घटनेमुळे मात्र एकच खळबळ उडाली आहे.